क्रिकेट खेळाचा भविष्यात ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, अशी आशा भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिस्त आणण्यासाठी कोणताही खेळ हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडूने मनापासून खेळले पाहिजे, असे कपिल देव यावेळी म्हणाले. नोएडामध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, प्रत्येकाने खेळाप्रती जागरुक असायला हवे असे मला मनापासून वाटते. खेळामुळे शरीर सुदृढ राहते. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून तासभर तरी खेळले पाहिजे. तरुणांनी तर आपल्या उमेदीच्या काळात मैदानात घाम गाळलाच पाहिजे. देशातील तरुणांमध्ये प्रतिभा आहे तिला वाव देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. नजिकच्या काळात क्रिकेटचा देखील ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला पाहायला मिळेल, असेही कपिल देव पुढे म्हणाले.

PHOTOS: ऑलिम्पिक स्पर्धेचे हे अप्रतिम क्षण तुम्ही पाहिलेत का?

खेळ जगताला सध्या रिओ ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. जगतील फक्त १२ ते १४ देशच क्रिकेट खेळत असल्याचे ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होणे कठीण आहे. ही वस्तुस्थिती असली तरी इटली, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये क्रिकेट खेळाप्रतीच्या आवडीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात आणखी बऱयाच देशांचे क्रिकेट संघ खेळताना पाहायला मिळतील अशी आशा असल्याचे कपिल देव म्हणाले.

VIDEO: जमैका कसोटीत पावसाचा खेळ, भारताचा विजय लांबणीवर