अ‍ॅथलेटिक्समधील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीची मालिका शेवटच्या दिवशीही कायम राहिली. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना सपशेल अपयशाला सामोरे जावे लागले.

थोनाकल गोपीने ४२ किलोमीटर १९५ मीटरचे अंतर २ तास १५ मिनिटे २५ सेकंदांत पार करीत २५वे स्थान घेतले. त्याच्यापाठोपाठ त्याचा सहकारी खेतारामने ही शर्यत पार केली. त्याने २६वा क्रमांक मिळवताना २ तास १५ मिनिटे २६ सेकंद वेळ नोंदवली. नितेंदर सिंग रावतला ८४वे स्थान मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास दोन तास २२ मिनिटे ५२ सेकंद वेळ लागला.

केनयाच्या किपचोगे एलियुडने हे अंतर दोन तास ८ मिनिटे ४४ सेकंदांत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. इथिओपियाच्या लिलेसा फेयिसा याने रौप्यपदक मिळवले. ही शर्यत पार करताना त्याला दोन तास ९ मिनिटे ५४ सेकंद वेळ लागला. अमेरिकेच्या रुप गॅलेनने कांस्यपदक मिळविले. त्याने ही शर्यत दोन तास १०.०५ मिनिटांत पार केली.