ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी मी पहिली महिला कुस्तीपटू ठरेन, असे मला वाटले नव्हते. या पदकामुळे माझी गेल्या १२ वर्षांपासूनची तपस्या फळाला आली आहे, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू साक्षी मलिक हिने व्यक्त केली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या १२ व्या दिवशी साक्षी मलिकने भारताचे पदकांचे खाते उघडले. तिने  ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला. या स्पर्धेचे सुवर्णपदक जपानच्या कोओरी इकोने पटकावले. तर रशियाच्या वालेरिया काबलोवाने रौप्य पदक मिळवलं. काबलोवानेच उपांत्यपूर्व फेरीत साक्षीला पराभूत केले होते.
साक्षी ही ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. साक्षीच्या रूपाने ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्यांदा एखाद्या भारतीय महिला खेळाडूने पदकावर नाव कोरले आहे. हरियाणाच्या २३ वर्षीय साक्षीने यापूर्वी २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक तर आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही तिने यशाचा हाच कित्ता गिरवत भारतीयांची मान उंचावली आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साक्षीचे कौतूक केले आहे. साक्षी मलिकने इतिहास रचला आहे. संपूर्ण देश खुष आहे. रक्षाबंधनच्या शुभदिनी भारताच्या मुलीने पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे, असे मोदींनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.