23 July 2019

News Flash

आई-वडील व प्रशिक्षकांचे योगदान मोलाचे -सिंधू

सगळ्या प्रयत्नांना देवाची साथ मिळाल्याने पदकाचे स्वप्न साकार झाले असेही तिने सांगितले.

| August 23, 2016 04:06 am

‘‘मायदेशी परतल्यानंतर झालेले स्वागत भारावून टाकणारे आहे. अशा वातावरणाची मी कल्पनाच केली नव्हती. मी अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. परिश्रमाला पर्याय नाही. कुटुंबीय आणि प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचे योगदान मोलाचे आहे. आई-वडिलांनी खूप गोष्टींचा त्याग केला आहे. गोपीचंद यांच्यासारखा मार्गदर्शन लाभणे माझे भाग्य आहे. अशा स्वरूपाचा पाठिंबा मिळाल्यास अनेक मुले बॅडमिंटनकडे वळतील,’’ असा विश्वास पी.व्ही. सिंधूने व्यक्त केला. सगळ्या प्रयत्नांना देवाची साथ मिळाल्याने पदकाचे स्वप्न साकार झाले असेही तिने सांगितले.

‘‘एका वेळी एका सामन्याचा विचार केला. ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी स्वत:वर विश्वास होता आणि १०० टक्के प्रदर्शन देण्यासाठी सज्ज होते. पदकाचा विचार केलाच नव्हता. देशवासीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करू शकले ही भावना सुखावणारी आहे. ही जबाबदारी खूप मोठी आहे. याची मला जाणीव आहे. सातत्याने चांगले खेळण्याचा प्रयत्न असेल,’’ असे सिंधूने सांगितले.

दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधले आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलेल्या सायनाविषयी विचारले असता सिंधू म्हणाली, ‘‘सायनाने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तिच्या नावावर असंख्य जेतेपदे आहेत. दुखापतीमुळे ऑलिम्पिकमध्ये तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.’’

सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. मात्र तिच्या कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते. ती काय किमया करू शकते, याची एक झलक आपण अनुभवली. क्षमतेला न्याय देत परिपूर्ण खेळाडू होण्यासाठी थोडा वेळ लागेल. आपण संयम बाळगणे आवश्यक आहे. ती फक्त २१ वर्षांची आहे. आणखी दहा वर्षे ती खेळू शकते. जगातील अव्वल खेळाडू होण्याची ताकद तिच्याकडे आहे. ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा व्यासपीठावर दडपण झुगारून देत सिंधूने केलेले सातत्यपूर्ण प्रदर्शन मोलाचे आहे. रिओसाठी चांगल्या पद्धतीने तयारी झाली होती. परिश्रम घेण्याची तिची तयारी आहे.

-पुल्लेला गोपीचंद

First Published on August 23, 2016 4:06 am

Web Title: mom dad and coach gopichand contribution is important says pv sindhu