भारताचा मल्ल नरसिंग यादवला उत्तेजक प्रकरणी निदरेष ठरविण्याचा राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) घेतलेल्या निर्णयाचा जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) आढावा घेतला जाणार आहे.

वाडा संस्थेचे प्रसार समन्वयक मॅगी डुरँड यांनी सांगितले, ‘नरसिंगबाबतचा संपूर्ण अहवाल आम्ही मागितला आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणी टिप्पणी करणे उचित ठरणार नाही.’

नाडा संस्थेचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले, ‘नरसिंगला उत्तेजक प्रतिबंधक समितीने त्याच्याविरुद्ध घेतलेल्या निर्णयाबाबत क्रीडा लवाद न्यायालयात २१ दिवसांमध्ये अपील करता येते.’

नरसिंग याने जाणीवपूर्वक उत्तेजक घेतलेले नसून त्याला याबाबत गोवण्यात आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्याच्या आहारात उत्तेजक पदार्थ मिसळला असावा. त्यामुळे उत्तेजक प्रकरणी तो निदरेष आहे, असा निर्णय नाडा संस्थेने दिला होता.

अगरवाल यांनी पुढे सांगितले, ‘दोन जूनपूर्वी नरसिंग याची अनेक वेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तो एकदाही दोषी आढळला नव्हता. दोन जून रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत तो दोषी आढळला. आमच्या संस्थेच्या नियमावलीनुसार त्याचा यापूर्वीचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊनच आम्ही त्याला दोषमुक्त केले आहे.’

नरसिंगला सर्वतोपरी मदत करू – क्रीडा मंत्री

नरसिंग यादवला ऑलिम्पिकपर्यंत पाठवण्यासाठी आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी दिले आहे.

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीपुढे नरसिंगची सुनावणी झाली होती. या समितीने नरसिंगची निदोर्षत मुक्तता केल्याने तो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यता वाढली असली तरी या मार्गामध्ये काही अडचणी येऊ शकतात. या अडचणींच्या काळात आम्ही नरसिंगच्या पाठिशी असू असे गोयल यांनी सांगितले.

‘नरसिंगला नाडा संस्थेच्या शिस्तपालन समितीने निर्दोष ठरवले आहे. पण आता जागतिक कुस्ती संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्याकडून नरसिंगला परवानगी मिळवावी लागेल. त्याचबरोबर जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) नरसिंगच्या निकालाचा आढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या प्रक्रीयेमध्ये आम्ही त्याच्या पाठिशी ठाम उभे राहणार आहोत,’ असे गोयल यांनी सांगितले.