भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून क्रीडा लवादने त्यांच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा स्वप्नांवर विरजण घातले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने ऑलिम्पिक खेळण्यासाठी चार वर्षांची बंदी घातली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता. ‘नाडा’च्या या निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. क्रीडा लवादाने या प्रकरणात नरसिंगला दोषी ठरवत त्यावर बंदी घातली. शुक्रवारी पहाटे हा  निर्णय जाहीर करण्यात आला. नरसिंग विरोधात कारस्थान रचले गेल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याने ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने हा निर्णय दिला तसेच त्याला संध्याकाळपर्यंत रिओ सोडून जाण्याचे आदेशही देण्यात आले. ‘वाडा’ने या प्रकरणात फार उशीराने लक्ष घालते त्यामुळे भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी नाराजी दर्शवली होती. खरतर ‘नाडा’, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेनंतरच नरसिंग ऑलिम्पिक खेळण्यासाठी रिओमध्ये  दाखल झाला होता. परंतु सामन्याला काही तासांचा अवधी असताना सीएएसने दिलेल्या निर्णयामुळे नरसिंगचे भारताला पदक मिळवून देण्याचे स्वप्न हुकले.