News Flash

फक्त नरसिंगच दोषी कसा?

भारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.

सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की भारताचा मल्ल नरसिंग यादववर आली. चार वर्षांपासून तो ज्या क्षणाची वाट पाहात होता, जे स्वप्न त्याने देशवासीयांसाठी पाहिले होते ते उद्ध्वस्त झाले होते. ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही, हे ऐकल्यावर तो बेशुद्धच झाला. उत्तेजक सेवन प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका क्रीडा लवादाने ठेवला होता. पण या प्रकरणात फक्त नरसिंगच दोषी नाही तर भारतातील विविध संघटना, त्यांची कार्यपद्धती, संघटक, यंत्रणा यांचाही हा दारुण पराभव आहे. भारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.

नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याची ‘री’ सारेच ओढत होते. पंतप्रधानांनी लक्ष घातल्यामुळे काही सकारात्मक गोष्टी घडल्या. त्याला ऑलिम्पिकला जायला मिळाले. पण त्यानंतर काय समस्या येऊ शकतात, याचा अभ्यास कोणीच केला नाही. ‘नाडा’ने कोणतेही सबळ पुरावे नसताना नरसिंगला निर्दोष ठरवले. पण जे दोषी आहेत त्यांना शोधण्यात यंत्रणेला अपयश आले. संघटकही गाफील राहिले. सारे काही अनुरूप करता येऊ शकते, असे त्यांना वाटले. याच वृत्तीने घात केला. भारतात नियम मोडल्यावर चिरीमिरी देऊन सुटता येते, पण कायद्याचे काटेकोर पालन बाहेरच्या देशांमध्ये होते, हे आपण विसरलो. या प्रकरणात ‘वाडा’ आणि क्रीडा लवादाचे काहीच चुकलेले नाही. त्यांनी निष्पक्षपणे हे प्रकरण हाताळले. क्रीडा लवादाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर भारताच्या कोणत्याच संघटकाकडे नव्हते. या प्रकरणातून नरसिंग सहीसलामत सुटला असता, पण कसा या गोष्टीकडे कुणीच लक्ष दिले नाही.

नरसिंगने आपल्या आहारात उत्तेजक मिसळल्याचे सांगितले होते. दिल्लीतील दोन कुस्तीपटू संशयितही होते. त्यांच्याविरोधात नरसिंगने पोलिसांमध्ये तक्रारही केली होती. या तक्रारीची गंभीर दखल कुणीही घेतली नाही. संघटक आणि पंतप्रधान यांनी या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे होते. आपल्या देशातील या घडीला असलेल्या सर्वोत्तम मल्ल्यांच्या बाबतीत असे घडत असताना यंत्रणा नेहमीसारखी भ्रष्टपणे वागली. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही की हे जाणूनबुजून करण्यात आले, याचा शोध घ्यायला हवा. कारण या प्रकरणात तपासाअंती जर हे दोघे दोषी आढळले असते तर नरसिंगसाठी आपल्याविरोधात कारस्थान झाल्याचा सबळ पुरावा मिळाला असता. हा पुरावा मिळाल्यावर नरसिंगला कुणीच थांबवू शकले नसते. त्याचबरोबर नरसिंगने ज्यांच्यावर अप्रत्यक्षपणे संशय घेतला, त्यांचीदेखील साधी चौकशी करण्यात यंत्रणा कुचकामी ठरली.

जवळपास सारेच जण क्रिकेटची भलामण करत फिरत असतात. पण जर ही गोष्ट एखाद्या क्रिकेटपटूच्या बाबतीत घडली असती तर तो या प्रकरणातून सुटला असता. कारण क्रिकेट संघटनांनी फक्त पैसाच कमावला नाही, तर कोणत्या घडीला काय करायला हवे, हे ते जाणतात. खेळाडूंच्या हिताबरोबर त्यांना दूरदृष्टी आहे, हेदेखील मान्य करावे लागेल. हरभजन सिंगचे ‘मंकी गेट’ प्रकरण भीषण होते. पण सारे काही ‘मनोहरी’ झाले, कारण तसा वकील बीसीसीआयने नियुक्त केला होता. नरसिंगसाठी या संघटकांना चांगला वकीलदेखील शोधता आला नाही. क्रीडा लवादापुढे चांगला वकील न मिळाल्याने त्याच्यावर बंदी ओढवली, हेदेखील तेवढेच कटू असले तरी सत्य आहे. कारण नरसिंगच्या वकिलांना त्याची बाजूच मांडता आली नाही. चार तासांच्या सुनावणीदरम्यान क्रीडा लवादाने ज्या प्रश्नांच्या फैरी झाडल्या, ‘वाडा’ने जे प्रश्न उपस्थित केले, त्याचे उत्तर नरसिंगच्या वकिलांकडे नव्हते. भारतासारखे इथे न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवता येत नाही, हे बहुतेक संघटक विसरले असावेत.

भारतात मुळात क्रीडा संस्कृती नाही. खेळ आणि खेळाडूंचे महत्त्व नाही. त्यांचा आदर नाही. पायाभूत सुविधा नाहीत. खेळाडूंना हिणवण्याचे सर्वाधिक प्रकार भारतातच होत असावेत. एखाद्या खेळाडूने पदक पटकावल्यावर त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होतो. पण या प्रक्रियेत असताना त्याला कोणी ओळखही दाखवत नाही. जिंकल्यावर डोक्यावर चढवायचे आणि वाईट झाल्यावर लचके तोडायची वृत्तीच आपली, त्याला कोण काय करणार? नरसिंगवर हा घाला स्वकीयांपासूनच झाला. तोही एका खेळाडूकडूनच. मग कसले संस्कृती आणि संस्काराचे गोडवे आपण गायचे. नरसिंग यापुढे काय करेल सांगता येत नाही. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात होता. अशा वेळी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत ही आपत्ती ओढवणे वाईटच. पण या प्रकरणात फक्त तोच दोषी नाही, तर संघटक, यंत्रणा करंटी ठरली, हे मान्य करायला हवे.

– प्रसाद लाड

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 2:48 am

Web Title: narsingh yadav in olympic games rio 2016
Next Stories
1 रिलेत भारतीय पुरुष संघ बाद
2 Rio 2016: गोल्फच्या अंतिम फेरीत अदिती अशोकची निराशजनक कामगिरी
3 VIDEO: सुवर्णपदक जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात तिने प्रशिक्षकालाच उचलून आपटले!
Just Now!
X