‘माझे रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे स्वप्न हिरावून घेतले आहे. मी निर्दोष आहे आणि माझे निर्दोषत्त्व सिद्ध करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी याआधीच खूप मोठ्या अडथळ्यांतून गेलो आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया कुस्तीपटू नरसिंग यादव याने दिली आहे. ‘गेल्या दोन महिन्यांपासून मी मानसिक त्रासातून जात आहे पण देशाला पदक मिळवून देण्याचे एकमेव स्वप्न माझ्या दुखावर फुंकर घालत होते. माझे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी काहीच तास उरले असताना अत्यंत निर्दयपणे माझ्यापासून माझे स्वप्न हिरावून घेतले गेले. मी निर्दोष आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, कारण हाच एकमेव पर्याय माझ्याकडे उरला आहे’ असेही नरसिंग म्हणाला. क्रीडा लवादाच्या निर्णयावर पहिल्यांदाच  नरसिंगने प्रतिक्रिया दिली. सामना काही तासांवर असताना ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने ऑलिम्पिक खेळण्यासाठी त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. तसेच रिओ व्हिलेज सोडून जाण्याचे आदेश देखील त्याला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता, परंतु आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे त्याने सिद्ध केल्यावर त्याला ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता. ‘नाडा’च्या याच निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. त्याचा सामना सुरू होण्यासाठी काही तास उरले असतानाच त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ‘या निर्णयानंतर नरसिंगला मोठा धक्का बसला असून तो फक्त आणि फक्त आक्रोश करत आहे, तो बोलण्याचा मनस्थितीत नाही’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या ब्रिजभूषण सिंह यांनी दिली होती.