एएफआयचे सचिव व्हॉलसन यांचा दावा; द्विसदस्यीस समिती स्थापन

‘रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील ४२ किमीच्या मॅरेथॉन शर्यतीत आपल्याला पाण्यासारखी प्राथमिक सुविधाही पुरवण्यात आली नव्हती. त्यामुळे मला प्राण गमवावे लागले असते,’ असा आरोप करून भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) कारभाराला लक्ष्य करणाऱ्या धावपटू ओ. पी. जैशाला महासंघाने घरचा आहेर दिला. ‘ऑलिम्पिक स्पध्रेतील निराशाजनक कामगिरी लपवण्यासाठी जैशा असे बिनबुडाचे आरोप करीत आहे,’ असा दावा एएफआयचे सचिव सी. के. व्हॉल्सन यांनी केला आहे.

ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक खेळाडूंचे पथक घेऊन रिओत गेलेल्या भारताला अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यात अपयश आले. एक रौप्य आणि एक कांस्यपदकावरच भारताला समाधान मानावे लागले. लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताच्या खात्यातील चार पदके कमी झाली. या निराशाजनक कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर जैशाच्या आरोपांनी क्रीडा क्षेत्राला ढवळून काढले होते. मात्र मंगळवारी एएफआयने सडेतोड उत्तर दिले. ‘मॅरेथॉन शर्यतीत तिची कामगिरी चांगली झाली नाही. म्हणूनच कदाचित ती असे आरोप करीत सुटली आहे,’ असे व्हॉल्सन म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘खेळाडूंना पाणी आणि ऊर्जा पेय देण्याची जबाबदारी आयोजकांची असते. त्यासाठी शर्यतीच्या ठिकाणी पाण्याचे आणि पेयाचे थांबे उभारण्यात आले होते. आम्हीही खेळाडूंना पाणी आणि ऊर्जा पेय पुरवू शकलो असतो; परंतु त्यांच्या प्रशिक्षकांनी तशी मागणी आमच्याकडे केली नाही.’

दरम्यान, मॅरेथॉनपटू कविता राऊतने परस्परविरोधी मत मांडले आहे. ती म्हणाली, ‘महासंघाने आम्हाला सर्व सुविधा पुरविल्या. मी केवळ माझ्याबद्दल बोलेन. मॅरेथॉन स्पध्रेपूर्वी अधिकाऱ्यांनी  पाणी आणि ऊर्जा पेयसाठी विचारणा केली होती, परंतु मी ती नाकारली. जैशा आणि तिचे प्रशिक्षक यांनी सभेत सहभाग घेतला नव्हता, म्हणूनच त्यांना पाण्याची बाटली ठेवण्याबाबत माहीत नसावे.’+क्रीडा मंत्रालयाची द्विसदस्यीय समिती

धावपटू ओ. पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी द्विसदस्यीय समिती स्थापन केल्याची घोषणा केली. ‘क्रीडामंत्री विजय गोयल यांनी द्विसदस्यीय समितीची घोषणा केली असून यामध्ये सरचिटणीस ओंकार केडिया आणि अधिकारी विवेक नारायण यांचा समावेश आहे. हे जैशाच्या आरोपांची चौकशी करतील,’ असे क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मला खोटे बोलण्याची गरज काय? रिओमध्ये पाण्याची सुविधा नव्हती. भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा संघटनेवर मी आरोप करीत नाही. २१ किलोमीटरनंतर मी इतकी दमले होते की, मी एक मीटरही चालू शकत नव्हते.

– ओ. पी. जैशा

((   सी. के. व्हॉल्सन ))