उत्तेजकांचे सेवन केल्याचा ठपका; रिओ प्रवास तूर्तास लांबणीवर

भारताच्या रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या तयारीला आणखी एक धक्का बसला आहे. २०० मीटर शर्यतीत सहभागी होणारा धावपटू धरमबीर सिंग याच्यावर उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मागील महिन्यात एका स्पध्रेदरम्यान त्याने हे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तब्बल ३६ वर्षांनंतर ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेतील २०० मीटर शर्यतीत भाग घेणारा धरमबीर हा पहिला भारतीय पुरुष धावपटू ठरणार होता. मात्र ११ जुलैला बंगळुरू येथे झालेल्या भारतीय ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेदरम्यान राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था (नाडा) यांनी घेतलेल्या ‘अ’ चाचणीत त्याने अ‍ॅनाबोलिक स्टेरॉइड्सचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु धरमबीर उत्तजेक चाचणीत अपयशी ठरल्याचे ‘नाडा’ किंवा भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ या दोघांपैकी कोणीही स्पष्ट केलेले नाही.

हरयाणाचा २७ वर्षीय धरमबीर मंगळवारी रिओकडे प्रयाण करणार होता. परंतु त्याला न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आता त्याच्या ‘ब’ नमुन्याची चाचणी होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.

जर धरमबीरच्या ‘ब’ नमुन्यांतसुद्धा उत्तेजकांचे अंश आढळल्यास त्याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. याचप्रमाणे दुसऱ्यांदा हा गंभीर प्रकार केल्याबद्दल त्याच्यावर आठ वष्रे बंदीची कारवाई होऊ शकते.

२०१२च्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पध्रेत उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी धरमबीरला १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक गमवावे लागले हाते. आता पुन्हा तो दोषी सापडल्यास त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

क्रीडा वैद्यकतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाडा’ने २०१५ला लागू केलेल्या ताज्या कलमांनुसार धरमबीरवर आजीवन बंदी येऊ शकणार नाही, मात्र कमाल आठ वर्षांची शिक्षा होऊ शकेल. बंगळुरूला झालेल्या २०० मीटर स्पध्रेतर २०.५० सेकंद अशी वेळ त्याने नोंदवली होती. त्यामुळे त्याने २०.४५ सेकंद ही ऑलिम्पिक पात्रता वेळ नोंदवली होती. त्यामुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने त्याला ऑलिम्पिकची संधी दिली होती.

याआधी, गोळाफेकपटू इंदरजीत सिंग आणि कुस्तीपटू नरसिंग यादव हे दोघे जण उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी सापडले होते. मात्र ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने त्यांच्या नावांना हिरवा कंदील दिला होता.