21 February 2019

News Flash

खोगीरभरतीचे ऑलिम्पिक!

दक्षिण सुदान, कॉमरॉस, अरुबा, बुरकिना फासो, बुरंडी, प्युअटरे रिको-ही काही नावे आहेत

दक्षिण सुदान, कॉमरॉस, अरुबा, बुरकिना फासो, बुरंडी, प्युअटरे रिको-ही काही नावे आहेत ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या देशांची. एरवी हे देश जगाच्या नकाशात कुठे वसले आहेत, याचा शोध आपण घेतला नसता; परंतु क्रीडा विश्वातल्या महासोहळ्यात या देशांचे खेळाडू खेळत आहेत, पदकेही मिळवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. शंभरीही ओलांडलेल्या आपल्या पथकाच्या तुलनेत या टिकलीएवढय़ा देशांची पथकेही लहान आहेत, पण देश म्हणून ऑलिम्पिकच्या भव्य कॅनव्हासवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पृथ्वीच्या पाठीवर एवढे देश असतात, याची कल्पना ऑलिम्पिकच्या निमित्ताने येते. खेळांच्या महामेळ्यात पदक पटकावणे एवढाच त्यांचा उद्देश नाही. खेळांमध्ये महासत्ता असणाऱ्या देशांच्या शर्यतीत या लिंबूटिंबूंना पदकाची शक्यता धूसरच. मात्र ऑलिम्पिकच्या माध्यमातून बरेच छुपे हेतू साध्य होत असल्याने प्रत्येक ऑलिम्पिकगणीक सहभागी देशांची संख्या वाढते आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या देशांना एकत्र आणणे, हे ऑलिम्पिक चळवळीचे ध्येय आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत जागतिक पातळीवर स्वतंत्र देश म्हणून ओळख प्रस्थापित करणे, हे नव्याने निर्माण झालेल्या लहान देशांचे उद्दिष्ट असते. देशाचा झेंडा, राष्ट्रगीत तसेच चलन ही देशांतर्गत पातळीवर ओळख मानली जाते. आंतरराष्ट्रीय मंचावर संयुक्त राष्ट्रांशी संलग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देश म्हणून स्वायत्तता मिळते आणि नवा प्रवास सुरू होतो. संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजाचा भाग होणं किचकट प्रक्रिया असते. त्या तुलनेत ऑलिम्पिक चळवळीशी जोडले जाणे सोपे आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोसोव्हो आणि दक्षिण सुदान यांच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांना आपल्या परिवारात समाविष्ट केले. याबरोबरच या देशांच्या खेळाडूंचा ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेतला सहभाग पक्का झाला. काही देश संयुक्त राष्ट्रांच्या आधी ऑलिम्पिक समितीशी जोडले जातात. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या परिवारात १९३ देश आहेत तर ऑलिम्पिक समितीच्या चळवळीत २०६ देश आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजाचा देश म्हणून भाग होण्यापूर्वी राजकीय आणि सामाजिक परिमाणे अधोरेखित होतात. तैपेई आणि हाँगकाँगच्या प्रवेशाला चीनने विरोध केला. सर्बिया आणि रशियाने कोसोव्होच्या समावेशाला आडकाठी घेतली. ऑलिम्पिक चळवळीच्या बाबतीत विरोधाची शक्यता खूपच कमी असते. ऑलिम्पिकच्या निमित्ताने आपल्या खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी देशवासीय एकत्र येत असल्याने सत्ताधारी पक्षालाही फायदा मिळतो. लेबनॉन हा असाच बहुधार्मिक नागरिकांचा देश. १९४३पासून लेबनॉनचे पथक ऑलिम्पिकमध्ये असते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिक भेद विसरून एकत्रित येतात.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यानंतर छोटय़ा देशाचा क्रीडापटूही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची शिष्यवृत्ती आणि अन्य गोष्टींसाठी पात्र ठरतो. लहान देश खेळांसाठी स्वतंत्र निधी आणि पायाभूत व्यवस्था उभारू शकत नाहीत. अशा देशांना ऑलिम्पिक समितीची मदत महत्त्वपूर्ण असते. रिओ ऑलिम्पिक तयारीसाठी म्हणून ऑलिम्पिक शिष्यवृत्ती अंतर्गत लेबनॉनला १,३२,००० डॉलर्स देण्यात आले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या लेबनॉनच्या ११ खेळाडूंना दोन वर्षे विद्यावेतन देण्यात आले. सराव, प्रवास, क्रीडासाहित्य या खर्चासाठी त्यांना ही रक्कम उपयोगी पडली. काही वेळेला छोटय़ा देशांतील क्रीडापटूंना वैयक्तिक शिष्यवृत्ती देण्यात येते. रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ‘ऑलिम्पिक सॉलिडॅरिटी’ उपक्रमाअंतर्गत १५०० क्रीडापटूंना मदत पुरवण्यात आली. योग्य वेळी मिळालेल्या मदतीचा उपयोग करत या खेळाडूंनी १० सुवर्ण आणि एकूण २८ पदकांवर नाव कोरले आहे. कझाकिस्तानची २१ वर्षीय जलतरणपटू दिमित्री बलानदिनने देशासाठी पदक मिळवून दिले. ज्युडो प्रकारात मलजिंडा केलमेंडीने कोसोव्होला पहिल्याच ऑलिम्पिकवारीत सुवर्णपदक मिळवून दिले. चार वर्षांपूर्वी केलमेंडीने अल्बानिआचे प्रतिनिधित्व केले होते. या देशातून कोसोव्हो वेगळा झाला. ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली आणि केलमेंडीने कोसोव्होचे प्रतिनिधित्व केले. पण अशी उदाहरणे मोजकीच.

आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कारणांच्या निमित्ताने विकसित देश बैठका, परिषदांमध्ये एकत्र येतात. छोटे देश या पंचतारांकित सोहळ्यांत दुर्लक्षित राहतात. ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर छोटय़ा आणि नव्या कोऱ्या देशांना मिरवण्याची संधी मिळते. त्याच वेळी आम्ही देश आणि पर्यायाने मने जोडतो या सबबीवर ऑलिम्पिक समिती प्रत्येक स्पर्धेत देशांची खोगीरभरती करत टेंभा मिरवते. या उपक्रमाने चळवळीची गुणात्मक वाढ होत नाही मात्र ऑलिम्पिकचा पसारा वाढल्याचे कागदोपत्री दिसते. खोगीरभरती म्हणण्याचे कारण म्हणजे ३१व्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत ७३ देशांना एकही पदक मिळवता आलेले नाही. चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात ‘आम्हीपण आहोत बरे का’ या थाटात सहभागी व्हायचे आणि पुख्खा झोडून निरोप घ्यायचा. जागतिकीकरणाच्या पर्वानंतर सहभागी देशांची संख्या झपाटय़ाने वाढू लागलेय. परंतु वाढत्या स्पर्धक संख्येनुसार प्रतिनिधींचे आदरातिथ्य करण्यात बराच पैसा खर्च होतो. खोगीरभरतीपेक्षा दर्जात्मक व्याप्ती वाढणे ऑलिम्पिक चळवळीसाठी महत्त्वाचे आहे. ऑलिम्पिकसारख्या महाकाय सोहळ्याचे आयोजन आणि संलग्न गोष्टींसाठी कोटय़वधी रुपये खर्च आणि कर्ज डोक्यावर असताना किमान प्रदर्शन करणाऱ्या देशांनाच प्रवेश देत खर्चाला कात्री लावणे अत्यावश्यक आहे.

 Untitled-20

 

– पराग फाटक

parag.phatak@expressindia.com

First Published on August 22, 2016 2:36 am

Web Title: olympic games rio 2016 2