ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांच्या यादीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, टोकियोमध्ये २०२० साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेत पाच खेळांचा समावेश निश्चित झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नव्या खेळांच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या २८ खेळांचा समावेश असून त्यात पाच खेळांची भर पडून स्पर्धेतील एकूण खेळांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. बेसबॉल/सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्डींग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लायंबिंग हे पाच नवे खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या पाच खेळांच्या समावेशामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये या खेळातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया टोकिया ऑलिम्पिकचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी दिली.