रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय मॅरेथॉनपटूंनी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर ऑलिम्पिकपटूंनी भारतीय व्यवस्थापनाबाबत एक धक्कादायक खुलासा करून येथील प्रशासनाला लक्ष्य केले आहे. रिओ ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय पथकासोबत आलेल्या अधिकाऱयांनी आपल्याला पाणी देखील विचारले नव्हते, असा आरोप धावपटू ओपी जैशा हिने केला आहे. भारतीय अधिकाऱयांच्या याच निष्काळजीपणामुळे शर्यत संपल्यानंतर तहानेने व्याकूळ झालेली ओपी जैशा चक्कर येऊन खाली पडली होती.
मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात दर अडीच किलोमीटर अंतरावर प्रत्येक देशाला विसावा केंद्रासाठी (रिफ्रेशमेंट पॉईंट) जागा देण्यात आली होती. या केंद्रांवर इतर देशांचे अधिकारी पाणी, ग्लुकोज आणि इतर वस्तू घेऊन उभे होते. मात्र, भारतीय केंद्रांवर केवळ आपल्या देशाचे नाव आणि तिरंगा या व्यतिरिक्त काहीच नव्हते. इतकेच नाही, तर एकही भारतीय अधिकारी केंद्रांवर उपस्थित नव्हता, अशी धक्कादायक माहिती ओपी जैशा हिने ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राशी बोलताना दिली.

वाचा: सिंधू, दीपा, साक्षी आणि जीतू रायला ‘खेलरत्न’, तर ललिता आणि रहाणेला ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर

ती म्हणाली की, स्पर्धेवेळी खूप उकडत होते. स्पर्धा तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू झाली. पण आमच्यासाठी रिफ्रेंशमेंट पॉईंट्समध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. साधे पाणी देखील आम्हाला मिळाले नाही. आठ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर रिओ ऑलिम्पिक व्यवस्थापनाने केलेल्या सुविधेतून आम्हाला प्यायला पाणी मिळाले. इतर देशांचे प्रत्येक दोन किमी. अंतरानंतर रिफ्रेशमेंट पॉईंट्स उपलब्ध होते आणि आमचे रिफ्रेशमेंट पॉईंट्स रिकामी होते. खरंतर आम्हाला आमच्या पथकासोबतच्या अधिकाऱयांकडून पाण्याची व्यवस्था होणे अपेक्षित होते, तसा नियमच आहे. आम्ही दुसऱया देशांच्या प्रतिनिधींकडून पाण्याची मागणी करू शकत नाही. शर्यत संपल्यानंतर मला चक्कर आली आणि मी खालीच कोसळले. ऑलिम्पिक आयोजकांनी मला उपचार केंद्रात नेले. सात-आठ ग्लुकोज चढविल्यानंतर मला शुद्ध आली, असेही ती पुढे म्हणाली.

वाचा: …आणि कुस्ती प्रशिक्षकांनी थेट मॅटवर जाऊन कपडे काढले!