अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

ही घटना आहे २००१ मधील. बॅडमिंटन विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ऑल इंग्लंड स्पर्धेचं जेतेपद पटकावलेला तो तरुण खेळाडू विमानतळावर उतरला. पायाभूत सुविधांचीही वानवा असताना आणि दुखापतींनी सातत्यानं सतावूनही या तरुणानं अवघड असं जेतेपद नावावर केलं होतं. विमानतळावर स्वागताला त्याची आई आली होती. जेतेपदाचा चषक उंचावत मुलगा बाहेर येईल अशी आईची अपेक्षा. परंतु तो तरुण शांतपणे बाहेर आला. आईला नमस्कार केला. पण मुलगा वेगळ्याच विचारात असल्याचं आईला जाणवलं. आईनं काळजीनं विचारलं- ‘‘काय झालं?’’ तो तरुण बॅडमिंटनपटू म्हणाला, ‘‘हे जेतेपद अतिशय आनंद आणि समाधान देणारं आहे. यासाठी तुम्ही केलेला त्याग मला आठवतो आहे. अडथळ्यांच्या शर्यती पार करत सातत्यानं संघर्ष करत मला या जेतेपदापर्यंत वाटचाल करावी लागली. दुखापतीमुळे मी आणखी किती दिवस खेळू शकेन ठाऊक नाही. परंतु पुढच्या पिढीतील खेळाडूंना हा त्रास होऊ नये, यासाठी मी काही तरी करणार आहे.’’

तो तरुण होता पुल्लेला गोपीचंद. ते निव्वळ बोलून थांबले नाहीत. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांनी लवकरच निवृत्ती स्वीकारली. त्याआधीच प्रशिक्षण सुरू केलेल्या गोपीचंद यांच्या मनात अकादमीचा विचार होता. खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण असताना बॅडमिंटन अकादमीचा विचार धाडसाचा होता. ऑल इंग्लंड जेतेपदाच्या निमित्तानं आंध्र प्रदेश सरकारनं गोपीचंद यांना अकादमीसाठी हैदराबादजवळच्या गच्चीबाऊली इथं पाच एकर जागा देण्याचं जाहीर केलं. जागेचा प्रश्न सुटला, पण वास्तू उभारणीसाठी निधी नव्हता. उद्योजक आणि नातेवाईक निम्मगडा प्रसाद यांनी गोपीचंद यांची तळमळ लक्षात घेऊन पाच कोटी रुपये रक्कम दिली. अन्य नातेवाईकांच्या मदतीनं दीड कोटी रुपये जमले, पण तरीही पैसे कमी पडत होते. अखेर गोपीचंद यांनी स्वत:चं राहतं घर गहाण ठेवलं. गोपीचंद यांचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांच्या अभियानात पुरेपूर साथ दिली. यातूनच उभी राहिली गोपीचंद अकादमी. एकापेक्षा एक प्रतिभावान बॅडमिंटनपटूंना घडवणारी बॅडमिंटन पंढरी. १२व्या वर्षांपासून याच अकादमीत गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालत पदक परंपरा कायम राखली आहे. ऑलिम्पिक पदकाच्या निमित्ताने या गुरूशिष्य जोडीच्या तपश्चर्येला फळ मिळालं आहे.

 

प्रशिक्षण तंत्र आणि आचारसंहिता

  • ’ कोर्टवरचा सिंधूचा वावर मर्यादित राहतो आहे, हे लक्षात आल्यावर गोपीचंद यांनी शक्कल लढवली. कोर्टच्या मधोमध एक खुर्ची ठेवली. त्यावर सिंधूला बसायला सांगितलं. या खुर्चीत बसून सगळे फटके मारायला लावले.
  • ’ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर सिंधूच्या आवडत्या चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर प्रतिबंध. देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही बंदी. उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव. एकटय़ानं न जेवता गोपीचंद यांच्याबरोबरच भोजन घेणं अनिवार्य. खाद्यपदार्थातून काहीही दिले जाऊ शकते या पाश्र्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
  • ’ एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूनं स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला आहे. संपूर्ण चित्त बॅडमिंटनवर असावे, यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
  • ’ उंच उडी मारून प्रतिस्पध्र्याच्या दिशेने शरीरवेधी स्मॅश मारण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूचा खास सराव करून घेतला. सिंधूची उंची जास्त असल्याने प्रतिस्पर्धी तिला फटक्यांसाठी खाली वाकायला भाग पाडण्याची रणनीती आखतात. हे लक्षात घेऊन प्रदीर्घ रॅली आणि उंचीवरचे फटके खेळण्यावर भर राहील अशी रणनीती गोपीचंद यांनी आखली.
  • ’ गेल्या वर्षी सिंधूच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने जवळपास सहा महिने सिंधूला कोर्टपासून दूर राहावे लागले. पायाच्या हाडासंदर्भात पुन्हा अशी दुखापत उद्भवू नये, यासाठी प्रशिक्षक गोपीचंद, निष्णात डॉक्टर यांच्याशी चर्चा करून सिंधूच्या उजव्या पायातील शूजमध्ये विशेष सोल बसवण्यात आले आहे. जेणेकरून सपाट तळव्याला आधार मिळतो आणि हालचालीनंतरही पायावर ताण येत नाही.
  • ’ तासाभरापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लढतींसाठी सक्षम राहण्यासाठी गेले वर्षभर व्यायामशाळेत वजन उचलण्याचे प्रशिक्षण आणि र्सवकष तंदुरुस्तीचा सराव. गोपीचंद यांच्या सूचनेनुसारच अशी योजना आखण्यात आली.
  • ’ संपूर्ण सामन्यात आक्रमक देहबोली राखण्याची गोपीचंद यांची सूचना. ‘शाऊट अ‍ॅण्ड प्ले’ तत्त्व सिंधूच्या मनावर बिंबवण्यासाठी गोपीचंद यांनी रामण्णा यांची मदत घेतली. रामण्णा यांनी सिंधूच्या ऑलिम्पिक तयारीसाठी आठ महिन्यांची विशेष सुट्टी घेतली आहे.
  • ’ नेटजवळून शिताफीने फटके मारण्याच्या ‘ड्रिबल’ तंत्रासाठी गोपीचंद यांचा ११ वर्षीय मुलगा विष्णू सिंधूसह सराव करतो.
  • ’ सिंधू तसेच किदम्बी श्रीकांत या तरुण खेळाडूंविरुद्ध ४२ वर्षीय गोपीचंद खेळतात. तंदुरुस्ती आणि कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद यांनी स्वत:चा आहार बदलत वजन कमी केलं.

सिंधूचा उदय

साधारण बारा वर्षांपूर्वी गोपीचंद यांनी एका स्थानिक स्पर्धेदरम्यान सिंधूतील नैपुण्य हेरलं. काही दिवसांतच सिंधू अकादमीत सराव करू लागली. सिंधूचं घर अकादमीपासून ३० किलोमीटरवर असलेल्या सिकंदराबाद इथं होतं. सकाळी ४.३०ला सिंधूचे वडील तिला अकादमीत सोडत. सरावानंतर ते तिला शाळेत सोडत. शाळा संपल्यानंतर पुन्हा सरावासाठी अकादमीत घेऊन येत आणि सराव संपल्यावर बापलेक घरी जात. स्वत: अर्जुन पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रामण्णा यांनी लेकीसाठी नोकरी सांभाळून ही कसरत जमवली. मात्र जाण्यायेण्यात बराच वेळ जात असल्यानं पुढची दोन वर्षे अकादमीतच राहून सिंधूनं सराव केला. मात्र सिंधूला घरची आणि घरच्यांची आठवण येते हे गोपीचंद यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रामण्णा यांना अकादमीनजीक राहायला येण्याची विनंती केली. सिंधूच्या यशस्वी वाटचालीत गोपीचंद यांची भूमिका लक्षात घेऊन रामण्णा यांनी गच्चीबाऊली परिसरात घर घेतलं.