23 February 2019

News Flash

Rio 2016: पी.व्ही.सिंधूने गेल्या तीन महिन्यांत मोबाईल वापरला नव्हता- पुलेला गोपीचंद

उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव.

Pusarla V Sindhu: सिंधू तसेच किदम्बी श्रीकांत या तरुण खेळाडूंविरुद्ध ४२ वर्षीय गोपीचंद खेळतात. तंदुरुस्ती आणि कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद यांनी स्वत:चा आहार बदलत वजन कमी केलं.

रिओ ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदकाची कमाई करत भारताच्या पी.व्ही. सिंधूने नवा इतिहास रचला. मात्र, या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी सिंधूने अनेक आवडत्या गोष्टींचा त्याग केला होता, अशी माहिती तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी कालच्या सामन्यानंतर दिली. सध्याच्या युगात मोबाईल ही बहुतेकांसाठी मुलभूत गरज बनली आहे. मात्र, ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सिंधूने गेल्या तीन महिन्यांत मोबाईलला हातदेखील लावलेला नाही. पी.व्ही. गोपीचंद हे कडक शिस्तीचे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. जेव्हा शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा गोपीचंद यांनी सायना नेहवालपासून पी.व्ही. सिंधूपर्यंत कोणालाही किंचितही सूट दिलेली नाही. सर्वोत्तम गोष्ट साध्य करायची असेल तर जीवनातील लहानसहान आनंदांचा त्याग केला पाहिजे, हे गोपीचंद यांचे सूत्र आहे. त्यामुळेच गोपीचंद यांनी गेल्या काही महिन्यांत कडक शिस्तीत सिंधूकडून सराव करून घेतला होता.
Rio 2016: सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर शोभा डे म्हणाल्या..
एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूने स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला होता. मात्र, काल पदक मिळाल्यानंतर पुलेला गोपीचंद यांच्यातील कडक प्रशिक्षकाचे रूपांतर एका भावात झाले. त्यामुळे सिंधू आता मित्रांबरोबर व्हॉटसअॅपवर चॅट करू आणि हवे तितके आईस्क्रीमही खाऊ शकणार आहे. सिंधूने गेल्या तीन महिन्यांत मोबाईल वापरला नव्हता. त्यामुळे तिने पदक जिंकल्यानंतर मी सर्वप्रथम तिला तिचा मोबाईल फोन परत दिला. दुसरी गोष्ट म्हणजे, रिओत दाखल झाल्यापासून मी तिच्या गोड खाण्यावर विशेषत: आईस्क्रीम खाण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता सिंधू तिला हवे ते खाऊ शकणार आहे, असे गोपीचंद यांनी सांगितले.
Rio 2016: मला घरी जाऊन रसगुल्ले खायचे आहेत- दीपा कर्माकर

प्रशिक्षण तंत्र आणि आचारसंहिता

* कोर्टवरचा सिंधूचा वावर मर्यादित राहतो आहे, हे लक्षात आल्यावर गोपीचंद यांनी शक्कल लढवली. कोर्टच्या मधोमध एक खुर्ची ठेवली. त्यावर सिंधूला बसायला सांगितलं. या खुर्चीत बसून सगळे फटके मारायला लावले.
* ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर सिंधूच्या आवडत्या चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर प्रतिबंध. देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही बंदी. उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव. एकटय़ानं न जेवता गोपीचंद यांच्याबरोबरच भोजन घेणं अनिवार्य. खाद्यपदार्थातून काहीही दिले जाऊ शकते या पाश्र्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
* एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूनं स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला आहे. संपूर्ण चित्त बॅडमिंटनवर असावे, यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
* उंच उडी मारून प्रतिस्पध्र्याच्या दिशेने शरीरवेधी स्मॅश मारण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूचा खास सराव करून घेतला. सिंधूची उंची जास्त असल्याने प्रतिस्पर्धी तिला फटक्यांसाठी खाली वाकायला भाग पाडण्याची रणनीती आखतात. हे लक्षात घेऊन प्रदीर्घ रॅली आणि उंचीवरचे फटके खेळण्यावर भर राहील अशी रणनीती गोपीचंद यांनी आखली.
* गेल्या वर्षी सिंधूच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने जवळपास सहा महिने सिंधूला कोर्टपासून दूर राहावे लागले. पायाच्या हाडासंदर्भात पुन्हा अशी दुखापत उद्भवू नये, यासाठी प्रशिक्षक गोपीचंद, निष्णात डॉक्टर यांच्याशी चर्चा करून सिंधूच्या उजव्या पायातील शूजमध्ये विशेष सोल बसवण्यात आले आहे. जेणेकरून सपाट तळव्याला आधार मिळतो आणि हालचालीनंतरही पायावर ताण येत नाही.
* तासाभरापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लढतींसाठी सक्षम राहण्यासाठी गेले वर्षभर व्यायामशाळेत वजन उचलण्याचे प्रशिक्षण आणि र्सवकष तंदुरुस्तीचा सराव. गोपीचंद यांच्या सूचनेनुसारच अशी योजना आखण्यात आली.
* संपूर्ण सामन्यात आक्रमक देहबोली राखण्याची गोपीचंद यांची सूचना. ‘शाऊट अ‍ॅण्ड प्ले’ तत्त्व सिंधूच्या मनावर बिंबवण्यासाठी गोपीचंद यांनी रामण्णा यांची मदत घेतली. रामण्णा यांनी सिंधूच्या ऑलिम्पिक तयारीसाठी आठ महिन्यांची विशेष सुट्टी घेतली आहे.
* नेटजवळून शिताफीने फटके मारण्याच्या ‘ड्रिबल’ तंत्रासाठी गोपीचंद यांचा ११ वर्षीय मुलगा विष्णू सिंधूसह सराव करतो.
* सिंधू तसेच किदम्बी श्रीकांत या तरुण खेळाडूंविरुद्ध ४२ वर्षीय गोपीचंद खेळतात. तंदुरुस्ती आणि कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद यांनी स्वत:चा आहार बदलत वजन कमी केलं.

First Published on August 20, 2016 10:48 am

Web Title: pv sindhu did not use her phone in the last three months pullela gopichand