रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया पी.व्ही.सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक आणि जीतू राय यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तर महाराष्ट्राचे खेळाडू ललिता बाबर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह एकूण १५ जणांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदकाची कमाई करून ऐतिहासिक कामगिरी केली, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्य पदक पटकावले. भारताची पहिलीवहिली जिम्नस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिने कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले. अवघ्या ०.१५० गुणांनी तिचे कांस्य पदक हुकले. ऑलिम्पिकसारख्या जागतिक व्यासपीठावर जाऊन जिम्नॅस्टिक्समध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात दीपाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली. व्हॉल्ट प्रकारात सर्वात कठीण समजल्या जाणाऱया प्रोड्युनोव्हा प्रकारात दीपाचा हातखंडा आहे. त्यामुळे दीपाने केवळ भारतीयांचेच नाही, तर संपूर्ण जगभरातील महिला जिम्नॅस्टिक्सपटूंचे लक्ष वेधून घेतले होते.

वाचा: ललिता बाबरला सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

दुसरीकडे, नेमबाज जीतू राय आणि धावपटू ललिता बाबर यांनीही रिओमध्ये समाधानकारक कामगिरी केली होती. ललिता बाबर हिने ३००० मी. स्टेपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे तिला अंतिम फेरीत १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. क्रीकेटमध्ये अजिंक्य रहाणे भारतीय संंघाच्या मधल्या फळीचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्यने महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सर्व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्याचा निर्णय घेत सरकारने पी.व्ही.सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक आणि जीतू राय यांना खेलरत्न, तर एकूण १५ जणांना अर्जुन पुरस्कार देण्याचे जाहीर केले. अर्जुन पुरस्कारांमध्ये अजिंक्य रहाणे, ललिता बाबर, शिवा थापा आणि अपूर्वी चंडेला यांचा समावेेश आहे.

वाचा: २०२० स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण निश्चित: पी. गोपीचंद