विश्व अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या वांग इहानला सरळ दोन सेटमध्ये पराभव करत ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत सिंधूने वांग इहानला २२-२०, २१-१९ अश्या सरळ सेटमध्ये हरवत सामना खिशात टाकला. सिंधू आता पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
सामन्याला सुरूवात होताच पहिल्या सेटमध्ये चीनच्या इहानने आक्रमकर खेळण्यास सुरूवात केली. दोन्ही खेळाडुंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस लागलेली होती. मात्र, सिंधूने मोक्याच्या क्षणी स्वत:चा खेळ उंचावत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने अधिक आक्रमक खेळ करत इहानला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहोचणारी सिंधू ही दुसरी महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी सायना नेहवालने या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली होती.
रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळत असला तरी पी.व्ही.सिंधू हिच्याकडून पदकाची आशा अद्याप कायम आहेत. पी.व्ही.सिंधूने आपल्या अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूचा पुढील सामना १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना जिंकून सिंधू भारताला पदक जिंकून देणार का, याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.