जपानच्या जिम्नॅस्टिकपटूला सव्वा तीन लांखांचे बिल

तरुणवर्गाच्या चर्चेच्या आणि उत्कंठेचा विषय ठरलेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमने आंतरराष्ट्रीय खेळाडूंवरही मोहिनी घातली आहे. त्यामुळेच रिओ ऑलिम्पिकनगरीत ‘पोकेमॉन गो’वर बंदी घालण्यात आल्याने अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे, तरीही संधी मिळेल तिथे त्यांनी आपली हौस पूर्ण केली.

जपानचा आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू कोहेई उचिमुराला मात्र ‘पोकेमॉन’चा शोध घेणे भलतेच महागात पडले आहे. जगभरात स्पध्रेसाठी फिरणाऱ्या या खेळाडूने ‘पोकेमॉन गो’साठी मोबाइलचा इतका वापर केला की मोबाइल कंपनीने त्याला तीन लाख ३४ हजार ४९९ (५ लाख येन ) रुपयांचे बिल पाठवले आहे. बिल हाती पडल्यावर ‘पाच लाख येन..’, अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया उचिमुराने दिली. संघ सहकारी केंझो शिराईने उचिमुराला धक्का बसल्याचे सांगितले. बिल पाहिल्यावर तो अवाकच झाला, असे शिराई म्हणाला.