गेल्या १६ दिवसांपासून ब्राझीलच्या भूमीवर सुरू असणाऱ्या रिओ ऑलिम्पिकची रविवारी दिमाखात सांगता झाली. समारोप सोहळ्यात ब्राझीलमधील कलाकारांनी यावेळी मनोवेधक कार्यक्रम सादर केले. रिओच्या महापौरांनी अलविदा रिओ असे म्हणत ऑलिम्पिक ध्वज टोकियोच्या गव्हर्नरांकडे सोपवला आणि रिओ ऑलिम्पिकची सांगता झाल्याचे जाहीर केले. आता पुढील ऑलिम्पिक स्पर्धा २०२० साली जपानच्या टोकियो येथे होणार आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्याची सुरूवात ब्राझीलच्या राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर रिओ २०१६ या शब्दांच्या आकारात मानवी साखळी करून ब्राझीलच्या कलाकारांनी ऑलिम्पिक सोहळ्याला निरोप दिला. दरम्यान, समारोप सोहळ्यात भारताला कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून देणाऱ्या साक्षी मलिक हिला ध्वजवाहकाचा मान देण्यात आला होता. रविवार हा रिओ ऑलिम्पिकचा शेवटचा दिवस होता. भारतीय खेळाडूंनी रिओत पहिल्या अकरा दिवसांत निराशा केली होती. मात्र, साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक आणि पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून भारताची लाज राखली. शेवटच्या दिवशी ६५ किलो वजनी गटात कुस्तीपटू योगेश्वर दत्त याच्याकडून भारताला पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्याला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तर मॅरेथॉनमध्ये भारताच्या थनाकल गोपी आणि खेता राम यांनी २५ वे आणि २६ वे स्थान मिळवले.