भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे रिओ ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मंगोलियाचा मल्ल गॅझोरीगीन याने सलामीच्या लढतीत योगेश्वर दत्तला ३-० असे पराभूत केले होते. योगेश्वरला पराभूत करणारा मंगोलियाचा मल्ल गॅझोरीगीन याने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली असती, तर योगेश्वरला पुन्हा एकदा कास्य पदकासाठी मैदानात उतरण्याची संधी मिळणार होती. मात्र, मंगोलियाच्या मल्लाचा पराभव झाल्यामुळे योगेश्वर दत्तची ‘रिपेशाज’ची संधी हुकली आहे. भारताला योगेंश्वर दत्तकडून पदकीचियी अपेक्षा होत्या. भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ २ पदकावरच समाधान मानावे लागणार आहे. योगेश्वरने पदक मिळवावे यासाठी देशभरातून पार्थना केली जात असताना त्याच्या हरिद्वारमध्ये गंगेच्या किनारी स्थानिकांनी योगेश्वरसाठी साकडे घातले होते. पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सोशल माध्यमातून योगेश्वरला पराभूत करणाऱ्या मंगोलियाच्या मल्लाच्या विजयासाठी देखील लोकांनी प्रार्थना केली. मात्र अखेर मंगोलियाचा मल्ल पराभूत झाल्याने भारताच्या कुस्ती आखाड्यातून पदक मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या. योगेश्वर दत्त चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. गतवर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने ६० किलो वजनी गटात कास्य पदकाची कमाई केली होती. योगेश्वरच्या गुडघ्यावर पाच शस्रक्रिया झाल्यानंतर अथक परिश्रमाने त्याने ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली होती. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर यंदाची ऑलिम्पिक अखेरची असल्याची घोषणा योगेश्वरने केली होती.