रशियास आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सरसकट परवानगी दिली असली तरी रशियाच्या १९ रोइंगपटूंना उत्तेजक कारणास्तव बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत रशियाच्या १०८ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.

रशियाच्या पाच कनोइंगपटू तसेच मॉडर्न पेन्टाथलॉनमधील खेळाडूंवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियाच्या ६७ खेळाडूंना यापूर्वीच ऑलिम्पिकमधील सहभागाबाबत मनाई केली आहे. जागतिक रोइंग महासंघाने बुधवारी बंदी घातलेल्या रशियाच्या १९ खेळाडूंसह एकूण २२ रोइंगपटूंना ऑलिम्पिक स्पर्धेतून डच्चू दिला आहे.

रशियन रोइंग महासंघाने हा निर्णय अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. महासंघाचे अध्यक्ष व्हेनियामिन यांनी सांगितले, ‘मला खूप धक्का बसला आहे. अजूनही आमची लढाई सुरू आहे. आमची ऑलिम्पिक समिती आयओसीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहे.’

रशियाला आता फक्त कॉक्सलेस फोरमध्ये भाग घेता येणार आहे. त्यांच्या पाव्हेल सोझीकिन याच्यावर बंदी घातली असल्यामुळे या क्रीडाप्रकारात त्याच्याबदली नवीन खेळाडूला भाग घेण्यास रशियाने परवानगी देण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अ‍ॅलेक्सी कोरोव्हाश्कोव्ह व कयाकिंगमधील दुहेरीतील सुवर्णपदक विजेता अ‍ॅलेक्झांडर द्याचेन्को यांचा समावेश आहे.

उत्तेजकप्रकरणी दोषी ठरलेल्या रशियन खेळाडूंच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आयओसीवर कडाडून टीका केली जात आहे. जर्मनीचा ऑलिम्पिक थाळीफेक विजेता रॉबर्ट हार्टिग याने आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांच्यावर टीका करीत सांगितले, ‘अध्यक्षांना उत्तेजक प्रतिबंधकापेक्षा उत्तेजकामध्येच रस दिसून येत आहे.’

बॅच यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितले, ‘रशियाच्या निदरेष खेळाडूंचा ऑलिम्पिकमधील सहभागाचा हक्क काढून घेता येणार नाही. कोणत्या खेळाडूंना सहभागी करून घ्यायचे हा संबंधित खेळाच्या महासंघाकडे हक्क आहे.’

 

रशियन खेळाडूंविना ऑलिम्पिक पदकाचे मोल घटणार

अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मत

पीटीआय, लुसान

रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालून रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील पदकाचे मोल राहणार नाही, असे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर रशियन खेळाडूंविना ऑलिम्पिक स्पर्धा फिकी असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत आत्तापर्यंत १०८ रशियन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात अ‍ॅथलेटिक्स संघातील ६८ पैकी ६७ खेळाडूंचा समावेश आहे. या वेळी रशियाच्या खेळाडूंविरुद्ध जाणीवपूर्वक चालवलेली मोहीम असल्याचा दावाही पुतिन यांनी केला.

ते म्हणाले, ‘आमच्या खेळाडूंशिवाय पटकावलेल्या पदकाचे मोल किती असेल याची जाण इतर खेळाडूंनाही आहे. ही स्पर्धा म्हणजे देखावा असेल.’ रशियाच्या तलवारबाजी, व्हॉलीबॉल आणि ट्रायथलॉन संघांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळालेली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) जाहीर केलेल्या अहवालानंतर रशियाच्या अ‍ॅथलेटिक्सना ऑलिम्पिक स्पध्रेत पाठवायचे की नाही, यावरूनही सत्ताधाऱ्यांमध्ये खलबते सुरू आहेत.

दोषी खेळाडूंची भेट

उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या खेळाडूंची बुधवारी पुतिन यांनी भेट घेतली. यामध्ये ट्रॅक अ‍ॅण्ड फील्डमधील दिग्गज येलेना इसिन्बायेव्हा, सेर्गेय श्युबेंकोव्ह आणि मारिया कुचिना यांचा समावेश होता.