बंदुकीचा धाक दाखवून आपल्याला लुटले गेल्याची तक्रार अमेरिकन जलतरणपटू रियान लोचेट व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी केली होती. मात्र हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर रियानने आपण खोटी तक्रार केल्याचे कबूल केले आणि जाहीर माफी मागितली.

रियानने तक्रार नोंदवल्यानंतर येथील पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली होती. रियानच्या तक्रारीत तथ्य नाही असे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रियानचे सहकारी गुन्नर बेट्झ, जॅक कांगोर, जिमी फिगेन यांना मायदेशी परत जाण्यापूर्वी रोखले व त्यांची पारपत्रे जप्त केली. दरम्यान, रियान हा मायदेशी पोहोचला होता. आपल्या सहकाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आल्याचे कळताच रियानने जाहीर माफी मागितली. अमेरिकन जलतरण महासंघानेही झालेल्या चुकीबद्दल संयोजकांची माफी मागितली.

रियान व त्याचे सहकारी शर्यत जिंकल्यानंतर एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे मद्यपान केल्यानंतर टॅक्सीतून आपल्या निवासाकडे येताना ते वाटेत एका पेट्रोलपंपापाशी असलेल्या मुतारीत गेले. मात्र त्यांनी रस्त्यावरच लघवी केली व तेथील काही फर्निचरची मोडतोड केली. त्यामुळे पेट्रोलपंपाच्या रखवालदाराने बंदुकीचा धाक दाखवत त्यांना खाली बसवले. रियानने आपली चूक कळू नये, यासाठी आपल्याला लुटले गेल्याचे कारस्थान रचले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या घटनेची चौकशी करण्याचे ठरवले असून या चारही खेळाडूंवर बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाई करण्याचे ठरवले आहे. रियान व त्याच्या सहकाऱ्यांनी तेथील बाथरूमचे दार तोडले व त्याबद्दल तेथील रखवालदाराने बंदुकीचा धाक दाखवत या खेळाडूंकडून पैशाची मागणी केली होती. त्यामुळे रखवालदार चुकीचाच वागला आहे, असे रियानचे वकील जेफ्री ऑस्ट्रो यांनी सांगितले.

 

सुवर्णफेक

दिलशोड नाझारोव्हने ताजिकिस्तानला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुष हातोडाफेक प्रकारात नाझारोव्हने ७८.६८ मीटर अंतर पार करून सुवर्णपदक निश्चित केले. ‘‘माझ्या फेसबुक अकाऊंटला हजारांहून अधिक ‘लाइक्स’ मिळाले. देशातील रहिवाशी माझ्या पाठीशी होते,’’ अशी प्रतिक्रिया नाझारोव्हने जेतेपदानंतर दिली. बेलारूसच्या इव्हान त्सीकहॅनने ७७.७९ मीटर अंतरासह रौप्य, तर पोलंडच्या वोजसिएच नोविकीने ७७.७३ मीटर अंतरासह कांस्यपदक जिंकले.

चेरुइयोटचा ऑलिम्पिक विक्रम

केनियाच्या व्हिव्हियन चेरुइयोटने जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या अल्माझ अयानाला नमवून महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने १४ मिनिटे २६.१७ सेकंदांत हे अंतर पूर्ण करून ऑलिम्पिक विक्रमही नोंदवला. केनियाच्याच हेलेन ओबीरीने (१४:२९.७७ से.) रौप्यपदक, तर इथोपियाच्या अयानाने (१४:३३.५९ से.) कांस्यपदक जिंकले. अयानाने याआधी १०,००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले होते.

अमेरिकेच्या महिलांचे वर्चस्व

महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत अमेरिकेच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. टियाना बाटरेलेट्टा, अ‍ॅलीसन फेलिक्स, इंग्लिश गार्डनर आणि टोरी बोवी यांचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने ४१.०१ सेकंदांची वेळ नोंदवली. जमैकाने ४१.३६ सेकंदासह रौप्य, तर ग्रेट ब्रिटनने ४१.७७ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.