ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनकडून होणा-या निराशा हा सध्या चर्चेचा विषय आहे. ज्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा होती ते बाहेर पडल्यामुळे भारतीयांच्या आशा भंगल्या. इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व करणा-या खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करत लेखिका शोभा डे यांनी नवा वादा ओढावून घेतला.  या खेळाडूंच्या बाजूने मात्र क्रिकेटचा देव उभा राहिला आहे. ‘ऑलिम्पिकमध्ये जाऊन तिथे खेळणे हे काही सोपे नसते, तुम्ही ज्यावेळी तिथे जाल तेव्हा तुम्हाला खरी कल्पना येईल की येथेपर्यंत पोहचणे हे किती कठिण असते.’  अशा शब्दात टीका करणा-या अनेकांचे तोंड सचिनने बंद केले आहे. एखादी गोष्ट ठरवली की  त्याप्रमाणे काहीच होत नाही. हाती आणि अपयश येते तेव्हा काय होते हे एक खेळाडू म्हणून मी चांगला जाणू शकतो, चढ उतार हे येतच असतात त्यामुळे या खेळाडूंबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असे सचिन तेंडुलकर म्हणाला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सचिन भारताचा सदिच्छा दूत आहे. भारताचा सदिच्छा दूत म्हणून मी रिओला गेलो या प्रत्येक खेळाडूंची मेहनत त्यांची उर्जा मी पाहिली. आज त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पाठिशी मी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो असेही कौतुकास्पद उद्गार सचिनने काढले.