23 February 2019

News Flash

ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू

भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला.

भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला. गेल्या ११ दिवसांपासून, एवढय़ा मोठय़ा भारत देशातले शंभर खेळाडू एकही पदक जिंकवून देऊ शकत नाही, या कुत्सित टोमण्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. १२ वर्षांपासून केलेली मेहनत अखेर फळाला आली आणि साक्षी मलिकने भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली.

महिलांच्या फ्री-स्टाईल प्रकारामध्ये ५८ किलो वजनी गटामध्ये साक्षीने किर्गिझस्तानच्या ऐसुलू तिनिबेकोव्हावर ‘रिपीचेज’मध्ये (दुसरी संधी) ८-५ असा विजय मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळात पदक पटकावणारी साक्षी पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय महिला आहे.

या लढतीमध्ये साक्षी सुरुवातीला ०-५ अशा पिछाडीवर होती. तेव्हा बऱ्याच जणांनी तिच्या विजयाच्या आशा सोडून दिल्या होत्या, पण अखेरच्या दहा सेकंदांमध्ये तिने नेत्रदीपक खेळ करत सामन्याचा नूर बदलला आणि कांस्यपदक पटकावले.

उपांत्यपूर्व फेरीत साक्षीला रशियाच्या व्हॅलेरिया कोब्लोव्हाकडून २-९ असा पराभव पत्करावा लागला होता, पण कोब्लोव्हा अंतिम फेरीत पोहोचल्याने साक्षीला ‘रीपीचेज’मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत तिने कांस्यपदक मिळवले.

सामन्याच्या सुरुवातीला ऐसुलूने साक्षीचे पाय पकडले आणि पटकन दोन गुण पटकावले. त्यानंतर साक्षीच्या चुकीचा फायदा घेत ऐसुलुने अजून एक गुण कमावला. त्यानंतर ऐसुलूने आक्रमकपणा कायम ठेवत अजून दोन गुणांची कमाई केली आणि ५-० अशी दमदार आघाडी घेतली. पहिल्या सत्रात एकही गुण कमावता न आलेल्या साक्षीने दुसऱ्या सत्रात जोरदार आक्रमण केले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच साक्षीने ऐसुलूला मॅटच्या बाहेर ढकलत दोन गुणांची कमाई केली. हीच चाल कायम ठेवत साक्षीने अजून दोन गुण मिळवत सामन्यात रंजकपणा आणला. सलग चार गुण कमावल्यावर साक्षीचे मनोबल कमालीचे उंचावले आणि आता हा सामना सोडायचा नाही, हे मनाशी पक्के केले. त्यानंतर एक गुण मिळवत तिने ऐसुलूशी ५-५ अशी बरोबरी साधली, पण एवढय़ावरच साक्षी थांबली नाही. त्यानंतर सलग तीन गुणांची कमाई करत साक्षीने इतिहास रचला.यापूर्वीच्या सामन्यात साक्षीने मंगोलियाच्या प्युरेव्हीडॉर्जिन ओर्खऑनविरुद्धची लढत १२-३ अशा मोठय़ा फरकाने जिंकली होती.

‘रिपीचेज’ म्हणजे काय?

फ्रेंच भाषेमध्ये ‘रिपीचेज’चा अर्थ दुसरी संधी असे म्हटले आहे. उपांत्यपूर्व लढतीत जर एखादा खेळाडू पराभूत झाला आणि त्याला पराभूत करणारा खेळाडू जर अंतिम फेरीत पोहोचला, तर पराभूत झालेल्या खेळाडूला कांस्यपदकासाठी खेळण्यासाठी संधी मिळते. या नियमानुसार दोन कांस्यपदके दिली जातात.

 

समस्त भारतीय तुझ्यासोबत आहेत. तुझे मनापासून अभिनंदन!

– ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री

 

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीचे मनापासून अभिनंदन. तू देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहेस.

– प्रणव मुखजी, राष्ट्रपती

 

रक्षाबंधनाच्या शुभदिवशी साक्षीने कांस्यपदकाची कमाई करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

 

अभिनंदन. साक्षीने इतिहास घडवला.

– अरुण जेटली, अर्थमंत्री

 

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला पहिले पदक मिळवून दिल्याबद्दल साक्षीचे अभिनंदन.

– विजय गोयल, क्रीडामंत्री

 

सकाळी उठल्यावर आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. रिओतील तुझ्या या यशाने समस्त भारतवासीयांना तुझा अभिमान वाटतो. खूप खूप अभिनंदन.

– सचिन तेंडुलकर, भारतरत्न

 

अभिनंदन.. तू दमदार खेळ केलास.. भारतीयांचे मनोधर्य उंचावल्याबद्दल आभार..

– अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज

 

आत्तापर्यंत भारतीय महिला खेळाडू न करता आलेली कामगिरी साक्षीने करून दाखवली. अनेकांना तू यशाचा मार्ग दाखवला आहेस.

– सुशील कुमार, कुस्तीपटू

 

कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या साक्षीच्या आईला सलाम.. साक्षीमुळे आज १२० कोटी जनता आनंदाचा क्षण साजरा करत आहेत.

– विजेंदर सिंग, बॉक्सिंगपटू

 

दमदार पुनरागमन करून साक्षीने भारताला रिओत पहिले पदक जिंकून दिले. पक्का निर्धार आणि आत्मविश्वास हा या कामगिरीमागील महत्त्वाच्या बाबी आहेत. अभिनंदन..

– महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटपटू

 

भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.. साक्षीचा अभिमान वाटतो.. जय हिंद..

– अमिताभ बच्चन, अभिनेता

 

साक्षीला ‘खेलरत्न’

भारत सरकारच्या नियमानुसार क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर साक्षी मलिकची दावेदारी मजबूत झाली आहे. ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू थेट या पुरस्कारासाठी पात्र ठरतो. साक्षीला अजून अर्जुन पुरस्कारही मिळालेला नाहीे. याआधी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती.

 

साक्षीवर बक्षिसांचा वर्षांव

  • ३.५ कोटी एकूण बक्षीस
  • ६० लाख भारतीय रेल्वे
  • २.५ कोटी हरयाणा सरकार
  • २० लाख क्रीडा मंत्रालय
  • २० लाख भारतीय ऑलिम्पिक संघटना
  • सध्या उत्तर रेल्वे विभागात कार्यरत साक्षीला राजपत्रित अधिकारी म्हणून बढती

 

बॉलीवूडमधून वर्षांव

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी साक्षीचे भरभरून कौतुक केले. यामध्ये आमिर खान, अक्षयकुमार, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, करण जोहर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मनोज बाजपेयी, आयुषमान खुराणा, रणदीप हुडा, सतीश कौशिक, सुनील ग्रोवर, तापसी पन्नू यांचा समावेश आहे.

दिग्गजही भारावले

साक्षीच्या अभिमानास्पद कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडूनही कौतुक झाले. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेतील कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोम, कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग, भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंदर सेहवाग, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, फिरकीपटू आर. अश्विन, पुरुष हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, हॉकीपटू रुपिंदर पाल सिंग, नेमबाज हीना सिधू, बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा यांनीही साक्षीवर कौतुकाचा वर्षांव केला.

 

 

 

First Published on August 19, 2016 3:39 am

Web Title: sakshi malik dedicates bronze medal to india