21 February 2019

News Flash

Rio 2016, Wrestling: भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले यश ; साक्षी मलिकची कांस्य पदकाची कमाई

बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला.

साक्षी आणि आयसुलू यांच्यातील ही लढत अतीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. पहिल्या तीन मिनिटांत आयसुलूने आक्रमक खेळ करत  ०-५ अशी बढत मिळवली, परंतू त्यानंतरच्या पुढच्या तीन मिनिटांत साक्षीने आक्रमक पवित्रा घेत सामना ५-५ अशा बरोबरीत आणला. अंतिम क्षणी जोरदार धक्का देउन साक्षीने आयसूलूला रिंगणाच्या बाहेर ढकलले आणि ३ गुणांची कमाई करत सामना आपल्या खिशात टाकला.
रशियाच्या महिला कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली आणि साक्षीनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळला असला तरी साक्षीने कुस्तीत भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीने कुस्ती पदक मिळवून दिल्यावर भारताला आता वेध लागले आहे ते दुस-या पदकाचे. भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीनच्या वांग इहानचा पराभव करत ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आता पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळेच सा-या भारतीयांचे लक्ष आता सिंधूच्या कामगिराकडे लागून राहिले आहे.

 

First Published on August 18, 2016 3:16 am

Web Title: sakshi malik wins bronze medal in womens wrestling 58kg category at rio 2016 olympics