15 August 2020

News Flash

अनमोल पदक!

साक्षीच्या पदकाचे मोल खूपच वेगळे आहे.

महाराष्ट्रापेक्षाही आकाराने व लोकसंख्येने कमी असलेले देश ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांचा खजिना लुटत असतानाच सव्वाशे कोटी लोकांचा भारत देश पदकापासून दूर होता. कमालीची जिद्द, संयम व चिकाटी लाभलेल्या साक्षी मलिकने कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवीत भारताला दिलासा देणारी कामगिरी केली आहे. महिलांच्या कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचाही पराक्रम तिने केला.

साक्षीच्या पदकाचे मोल खूपच वेगळे आहे. रिओ येथील ऑलिम्पिकसाठी आजपर्यंतचे सर्वात मोठे पथक भारताने पाठवले आहे. सायना नेहवाल, अभिनव िबद्रा, गगन नारंग, जितू राय आदी भरवशाच्या खेळाडूंना पदक मिळवण्यात अपयश आले होते. साहजिकच भारताची पाटी कोरी राहणार अशीच शंका निर्माण झाली होती. अपयशाच्या मालिकेत साक्षी ही पदक मिळवील, अशी कदाचित कोणी अपेक्षाही केली नव्हती. मात्र साक्षीने जबरदस्त आत्मविश्वास व जिगरबाज वृत्ती दाखवीत रिओ येथे लढती केल्या आणि सनसनाटी कांस्यपदक मिळवून दिले. भारताला यापूर्वी करनाम मल्लश्वरी (वेटलिफ्टिंग), एम. सी. मेरी कोम (बॉक्सिंग), सायना नेहवाल (बॅडमिंटन) यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून दिले आहे.

साक्षी ही हरयाणाची रहिवासी आहे. हरयाणा हे कुस्तीगिरांचे माहेरघर असले तरी तेथेही अजूनही अनेक ठिकाणी महिलांना क्रीडा प्रकारात सहभागी होण्याबाबत प्रोत्साहन दिले जात नाही. त्यातच कुस्ती, बॉक्सिंग यासारखे ताकदवान खेळ त्यांच्यापासून दूरच असतात. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर साक्षीचे व तिला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे खरोखरीच कौतुक करावेसे वाटते. मोखरा या खेडेगावात राहणाऱ्या साक्षीने कुस्तीत कारकीर्द घडवण्याचा लहानपणीच निर्धार व्यक्त केला. त्या वेळी तिच्या पालकांना सुरुवातीला आश्चर्य वाटले व त्यांच्यापुढे तिला या खेळासाठी प्रोत्साहन कसे द्यायचे, असा प्रश्नही त्यांच्यापुढे उभा ठाकला. परंतु तिची जिद्द पाहून त्यांनी तिला ईश्वर दहिया यांच्या आखाडय़ात पाठवले. मुलींनी खेळात येऊ नये अशीच वृत्ती तेथील लोकांमध्ये होती. त्यामुळे दहिया यांनाही विरोध झाला. मात्र मलिक कुटुंबीय व दहिया यांनी या टीकेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच साक्षीचे कुस्तीमध्ये करिअर घडू शकले.

रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये साक्षीने केलेल्या लढती पाहिल्या तर तिच्या कुस्ती कौशल्याच्या विविध पैलूंची झलक पाहायला मिळाली. प्रत्येक लढतीत सुरुवातीला ती पिछाडीवर होती. पराभवाच्या छायेतून यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द तिने दाखवली. भारताच्या अन्य खेळाडूंना जी इच्छाशक्ती दाखवता आली नाही, ती महत्त्वाकांक्षा तिच्या खेळात दिसून आली. कितीही झाले तरी आपल्याला देशासाठी पदक मिळवायचे आहे. त्याकरिता शेवटपर्यंत संयम व चिवटपणा दाखवला तर पदक आपोआप मिळणार आहे, हे ओळखूनच ती लढली व कमालीचे स्वप्नवत कांस्यपदक घेऊन आली. रिओ येथील प्रत्येक लढतीत तिच्या प्रतिस्पर्धी तिच्यापेक्षा अनुभव व वजनाने जास्त होत्या. असे असूनही तिने त्याचे दडपण न घेता विजयश्री खेचून आणली.

साक्षीने मिळवलेले पदक हे तिच्या एकटीचे नसून तमाम भारतीय महिलांचे प्रातिनिधिक यश आहे. अजूनही भारतात स्त्री म्हणजे ‘चूल व मूल’ यामध्ये रममाण होणारी व्यक्ती असते. पुरुषांप्रमाणेच तिच्याकडेही ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे, हे समाज ओळखत नाही. पुरुष व महिला यांच्याबाबत अजूनही असमानता आहे. क्रीडा क्षेत्रातील करिअरबाबतही महिलांना दुजाभावाचीच वागणूक मिळत असते. पारितोषिक व पुरस्कार, परदेशातील प्रशिक्षण, परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव, विविध सुविधा व सवलती आदींबाबत सतत भारतीय महिलांना दुय्यम वागणुकीचा अनुभव पाहायला मिळतो. साक्षीने भारतीय पुरुष खेळाडूंनाही लाजवणारी कामगिरी केली आहे. तिने मिळवलेल्या ऑलिम्पिक कांस्यपदकामुळे आता तरी क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 3:37 am

Web Title: sakshi malik wins olympic bronze in wrestling
Next Stories
1 ‘बेटी बचाओ, बेटी खिलाओ’
2 धडाकेबाज सिंधू
3 India wrestling, Babita Kumari, Rio 2016 Olympics: बबिता कुमारीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का
Just Now!
X