भारताची युवा महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात लेखिका शोभा डे सुद्धा मागे राहिल्या नाहीत. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या अपयशावरून आक्षेपार्ह ट्विट केलेल्या शोभा डे यांनी आज पी.व्ही.सिंधूच्या खेळीचे कौतुक केले आहे. पी.व्ही.सिंधू अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळली, या आशयाचे ट्विट शोभा डे यांनी केले.

PHOTOS: रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूची रौप्य मोहोर..

रिओमध्ये पहिल्या दहा दिवसानंतरही भारताच्या खात्यात एकही पदक न जमा झाल्याने शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंची निंदा करणारे ट्विट करून वाद ओढावून घेतला होता. भारतीय खेळाडू रिओला फक्त सेल्फी काढायला गेलेत, असे वादग्रस्त ट्विट शोभा डे यांनी केले होते. त्यानंतर भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्य पदकाची कमाई केल्यानंतर ट्विटरकरांनी शोभा डे यांच्या ट्विटला जशास तसे उत्तर देखील दिले. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनी शोभा डे यांना ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते. साक्षी मलिक के गले मे मेडल ‘शोभा दे’ रहा है, असे उपहासात्मक टीका वीरेंद्र सेहवागने केली होती. वीरूच्या ट्विटला अमिताभ बच्चन यांनीही पाठिंबा दिला होता.

पी.व्ही.सिंधूने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिला उत्तम झुंज दिली. सामना अगदी तिसऱया निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. पहिल्या सेटमध्ये सिंधूने बाजी मारली होती, तर दुसरा सेट मारिन हिने जिंकला. त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱया गेमवर अवलंबून होता. तिसऱया सेटमध्ये मारिने साजेशी कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. सिंधूला पराभव पत्कारावा लागला असला तरी तिची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी ठरली. कोर्टवर सर्वांनीच तिला टाळ्यांचा प्रतिसाद देऊन तिच्या कामगिरीचे कौतुक केले.