भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने रिओ ऑलिम्पिक २०१६च्या एकेरी महिला बॅडमिंटन स्पर्धेत काल धडक मारली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंधूच्या अंतिम फेरीत जाण्याने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता आहे. असे असताना स्तंभलेखिला शोभा डे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेय. शोभा डे यांनी धाडसी ट्विट करत म्हटलेय की, पी.व्ही.सिंधू ‘सिल्व्हर प्रिन्सेस’?.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, असे ट्विट केल्यानंतर त्यांच्या आताच्या ट्विटवर नेटिझन्सच्या कशाप्रकारे प्रतिक्रिया येतील हे काही वेगळे सांगायला नको. शोभा डेंच्या आधीच्या ट्विटवर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. अभिनव बिंद्रा, विरेंद्र सेहवाग यांसारख्या खेळाडूंसह अमिताभ बच्चन आणि अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला होता. पण, आधीच्या ट्विटवर इतकी टीका होऊनही डेंनी काहीच धडा न घेतल्याचे त्यांच्या आताच्या ट्विटवरून दिसते.

ऑलिम्पिकचे व्यासपीठ आणि देशासाठी पदक पक्के करण्याच्या अपेक्षांचे ओझे या दडपणाला झुगारून २१ वर्षीय पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत काल धडक मारली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओखुहारावर २१-१९, २१-१० असा विजय मिळवला. या विजयासह सिंधूचे रौप्यपदक पक्के झाले. मात्र अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मारिनला नमवत ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी सिंधूसमोर आहे.