उत्तेजक चाचणीच्या ‘ब’ नमुन्यातही गोळाफेकपटू दोषी

गोळाफेकपटू इंदरजित सिंगच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा आशा मंगळवारी जवळपास संपुष्टात आल्या असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या ‘ब’ नमुन्यातही तो दोषी आढळला आहे. २५ जून रोजी झालेल्या चाचणीत २८ वर्षीय इंदरजितच्या ‘अ’ नमुन्यात बंदी घातलेले प्रतिबंधक आढलेले होते.

तेच प्रतिबंधक ‘ब’ नमुन्यातही आढळले आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली.

इंदरजितवर तात्पुरत्या बंदीची कारवाई करण्यात आली असून ‘नाडा’ने त्याला दुसरी नोटीस बजावली आहे. ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीसमोर त्याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. २२ जूनला झालेल्या ‘अ’ चाचणीत दोषी आढळल्यानंतर पंजाबच्या या खेळाडूला ‘ब’ चाचणीबाबत विचारण्यात आले होते. त्याच्या अनुमतीनंतर ही चाचणी घेण्यात आली आणि त्यातही तो दोषी आढळला.

जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) नव्या नियमानुसार इंदरजितला चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागेल. तसेच ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या रिओ स्पध्रेलाही त्याला मुकावे लागणार आहे. इंदरजितने मात्र हा आपल्याविरुद्ध रचलेला कट असल्याचा दावा केला आहे.

तो म्हणाला, ‘हे कारस्थान आहे आणि यामध्ये काही तरी चुकीचे घडत आहे. माझ्या नमुन्यात बदल करण्यात आला आहे. तरी त्याची तपासणी वैद्यांनी करावी. आपल्या प्रकृतीला हानिकारक गोष्टीचे सेवन खेळाडू कशासाठी करेल?’

इंदरजित वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ही माझा आवाज बंद करण्याची मोहीम आहे, असा दावा करून तो म्हणाला की, ‘गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मी अनेकदा उत्तेजक चाचणीला सामोरे गेलो आहे. त्यानंतरही माझा आवाज दडपण्याची मोहीम राबवली जात आहे. या देशात अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्यांना असेच गप्प केले जाते.’