23 February 2019

News Flash

बिलेसचे विक्रमी सुवर्ण

‘फ्लोअर’ प्रकारात अव्वल; रिओत चौथ्यांदा अव्वल स्थान

फ्लोअरप्रकारात अव्वल; रिओत चौथ्यांदा अव्वल स्थान

एका ऑलिम्पिक स्पध्रेत पाच सुवर्णपदके पटकावण्याच्या मोहिमेत मंगळवारी खंड पडल्यानंतरही अमेरिकेच्या सिमोन बिलेसने नव्या दमाने खेळ करताना चौथ्या सुवर्णपदकाची कमाई करून रिओचा निरोप घेतला. बुधवारी झालेल्या ‘फ्लोअर’ प्रकारात जिम्नॅस्टिकपटू बिलेसने १५.९६६ गुणांची कमाई करून अव्वल स्थान पटकावले. एका ऑलिम्पिक स्पध्रेत चार सुवर्णपदके जिंकणारी बिलेस पाचवी महिला जिम्नॅस्टिकपटू आहे. अमेरिकेच्याच अ‍ॅलेक्झांड्रा रैस्मनने (१५.५००) आणि ग्रेट ब्रिटनच्या अ‍ॅमी टिंकलेरने (१४.९९३) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

‘‘मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि माझ्या संघावर खात्री होती. हा लांब पल्ला होता आणि या आठवडय़ात अनेक वेळा आम्ही खेळ केला. हा थकवणारा कालावधी होता. चांगल्या कामगिरीने आम्हाला निरोप घ्यायचा होता,’’ अशी प्रतिक्रिया बिलेसने दिली.

बिलेसच्या आधी हंगेरीच्या अँग्नेस केलेटी (१९५६), सोव्हियतच्या लॅरिस्सा लॅटिनिना (१९५६), चेक प्रजासत्ताकच्या व्हेरा कॅस्लाव्हस्का (१९६८) आणि रोमानियाच्या इकाटेरिना झाबो (१९८४) यांनी याआधी एका ऑलिम्पिक स्पध्रेत कलात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात चार सुवर्णपदके जिंकली आहेत.

 

विश्वविक्रमी बेहदाद : इराणचा वेटलिफ्टिंगपटू बेहदाद सलीमीकोर्दासिआबीने १०५ किलोहून अधिक वजनी गटाच्या स्नॅच प्रकारात २१६ किलो वजन उचलून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली, परंतु क्लीन अँड जर्क प्रकारात अपयश आल्यामुळे त्याला पदकाने हुलकावणी दिली. या गटात जॉर्जियाच्या लॅशा तलाखडझेने ४७३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. अर्मेनियाच्या गोर मिनास्यान (४५१) व जॉर्जियाच्या इराक्ली तुर्मानिडझे (४४८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

 

डेरेकची सुवर्णउडी : कॅनडाच्या डेरेक ड्रोइनने पुरुषांच्या उंच उडीचे सुवर्णपदक पटकावले. डेरेकने २.३८ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदकावर कब्जा केला. कतारच्या मुताझ एस्सा बार्शिमने २.३६ मीटर उंच उडीसह रौप्यपदक जिंकले. रिओमधील कतारचे हे पहिलेच पदक आहे. युक्रेनच्या बोहडॅन बोंड्रारेंकोने (२.३३ मी.) कांस्य जिंकले.

 

फेथ किपयेगॉनचे वर्चस्व : केनियाच्या फेथ किपयेगॉनने ४ मिनिटे ८.९२ सेकंदांची वेळ नोंदवताना महिलांच्या १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. इथोओपियाच्या गेंझेबे डिबाबाने ४ मिनिटे १०.२७ सेकंदांसह रौप्यपदक, तर अमेरिकेच्या जेनिफर सिम्पसनने ४ मिनिटे १०.५३ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले.

 

जमैकाचा नवा नायक : जमैकाच्या ओमार मॅक्लेओडने (१३.१७ से.) ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. स्पेनच्या ओर्लाडोला (१३.१७ से.) आणि फ्रान्सच्या दिमित्री बास्क्यू (१३.२४ से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

 

गतविजेत्यावर किप्रोटोची कुरघोडी

तिसऱ्या ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील असलेल्या केनियाच्या इझेकिएल केम्बोईला पराभूत करून सहकारी कोन्सेस्लूस किप्रुटोने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत बाजी मारली. किप्रुटोने ८ मिनिटे ०३.२८ सेकंदांच्या ऑलिम्पिक विक्रमी वेळेसह सुवर्णपदकावर कब्जा केला. २००४ आणि २०१२च्या विजेत्या केम्बोईला (८:०८.४७ से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या इव्हान जॅगेरने ८ मिनिटे ०४.२८ सेकंदांसह रौप्यपदक निश्चित केले.

 

First Published on August 18, 2016 3:22 am

Web Title: simone biles gold medal in olympic games rio 2016