07 August 2020

News Flash

धडाकेबाज सिंधू

अंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान

| August 19, 2016 03:34 am

जपानच्या नोझोमी ओखुहारावर मात ; अंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान

ऑलिम्पिकचे व्यासपीठ आणि देशासाठी पदक पक्के करण्याच्या अपेक्षांचे ओझे या दडपणाला झुगारून   पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओखुहारावर २१-१९, २१-१० असा विजय मिळवला. या विजयासह सिंधूचे रौप्यपदक पक्के झाले. मात्र अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मारिनला नमवत ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी सिंधूसमोर आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके नावावर असणाऱ्या सिंधूने ४९ मिनिटे चाललेल्या लढतीत ऑल इंग्लंड स्पर्धेची विजेती ओखुहाराला नमवत अंतिम फेरी गाठली. प्रतिस्पर्धी ओखुहाराच्या खेळाचा सखोल अभ्यास करून आलेल्या सिंधूने सर्वागीण खेळासह दिमाखदार विजय साकारला. लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘फुलराणी’ सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. रौप्यपदक पक्के करत सिंधूने एक पाऊल पुढे टाकले आहे. या लढतीआधी सिंधूची ओखुहाराविरुद्धची जय-पराजयाची कामगिरी १-३ अशी होती. मात्र आधीच्या पराभवातून बोध घेत

सिंधूने सरशी साधली. प्रदीर्घ रॅली, घोटीव ड्रॉपचे फटके आणि खणखणीत परतीच्या फटक्यांच्या बळावर सिंधूने दणदणीत वर्चस्व गाजवले.

अर्धा तास चाललेल्या लढतीत सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली. वांग यिहानसारख्या मातब्बर खेळाडूला नमवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूने आश्वासक सुरुवात केली. ओखुहाराच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सिंधूने ८-४ अशी आघाडी वाढवली. छोटय़ा चणीच्या ओखुहाराला प्रदीर्घ रॅलींमध्ये गुंतवत सिंधूने अडचणीत आणले. ड्रॉपच्या फटक्यांसह सिंधूने ओखुहाराला चकित केले. ३२ फटक्यांच्या रॅलीमध्ये क्रॉसकोर्ट परतीच्या फटक्यासह सिंधूने ९-६ आगेकूच केली. ओखुहाराच्या स्वैर फटक्यासह सिंधूने ११-६ अशी आघाडी मिळवली. ओखुहाराला प्रत्येक फटक्यासाठी कोर्टवर पळवत

सिंधूने १४-१० वाटचाल केली. ओखुहाराने शरीरवेधी स्मॅशच्या फटक्यांच्या बळावर झुंज दिली. मात्र अचूक सूर गवसलेल्या सिंधूने ओखुहाराच्या नेटवर आदळलेल्या फटक्यासह पहिला गेम नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ३-० आघाडी घेतली. मात्र विश्रांतीसह ताजीतवानी झालेल्या ओखुहाराने ३-३ अशी बरोबरी केली. यानंतर प्रत्येक गुणासाठी थरारक मुकाबल्याची पर्वणी बॅडमिंटन चाहत्यांना अनुभवता आली. ५-५ अशा स्थितीतून ८-८ परिस्थिती झाली. सिंधूची एकाग्रता भंग करण्यासाठी ओखुहाराने स्मॅशच्या फटक्याच्या आधार घेत १०-१० बरोबरी केली. मात्र यानंतर झंझावाती पवित्रा घेतलेल्या सिंधूने तडाखेबंद स्मॅशसह ओखुहाराला निरुत्तर केले. सिंधूच्या जोरकस स्मॅशसमोर ओखुहाराचे चैतन्य लोप पावले. स्मॅशच्याच दमदार फटक्यासह सिंधूने कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली.

आता स्पेनच्या मारिनचे आव्हान

अंतिम लढतीत सिंधूसमोर स्पेनच्या कॅरोलिन मारिनचे आव्हान असणार आहे. विश्वविजेती, ऑल इंग्लंड स्पर्धा विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली डावखुरी कॅरोलिन बॅडमिंटन विश्वातले नवे सत्ताकेंद्र आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चोख अभ्यासासाठी प्रसिद्ध आणि तंत्रकुशल फर्नाडो रिव्हास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी कॅरोलिन झंझावाती फटके आणि चिवट तंदुरुस्तीसाठी ओळखली जाते. उपांत्य फेरीच्या लढतीत मारिनने चीनच्या ली झेरुईवर २१-१४, २१-१६ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

  • पी. व्ही. सिंधूची कॅरोलिन मारिनविरुद्धची कामगिरी
  • हाँग काँग खुली स्पर्धा (२०१५) पराभूत १७-२१, ९-२१
  • डेनमार्क खुली स्पर्धा (२०१५) विजयी २१-१५, १८-२१, २१-१७
  • सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (२०१५) पराभूत १३-२१, १३-२१
  • ली निंग विश्व अजिंक्यपद स्पर्धा (२०१४) पराभूत १७-२१, १५-२१
  • ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा (२०१४) पराभूत १७-२१, १७-२१
  • मालदीव आंतरराष्ट्रीय (२०११) विजयी २१-७, १५-२१, २१-१३

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 3:34 am

Web Title: sindhu into rio olympics 2016 badminton final
Next Stories
1 India wrestling, Babita Kumari, Rio 2016 Olympics: बबिता कुमारीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का
2 Badminton Score, PV Sindhu, Rio 2016 Olympics: पी.व्ही.सिंधूचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश
3 VIDEO: साक्षीच्या कुटुंबियांनी असे केले विजयाचे सेलिब्रेशन
Just Now!
X