भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली असून, तिच्या अंतिम फेरीच्या सामन्याची उत्सुकता सर्वांना आहे. रिओमध्ये भारताच्या खात्यात अद्याप एकही सुवर्ण पदक जमा झालेले नसल्याने पी.व्ही.सिंधू ‘सुवर्ण’संधी हेरून भारताला सुवर्ण पदकाची कमाई करून देणार अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. पी.व्ही.सिंधूच्या अंतिम फेरीतील खेळीकडे आज सर्वांचे लक्ष असेल. २१ वर्षीय पी.व्ही.सिंधूने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकवारीत बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकसाठी तिने गेल्या चार वर्षांत घेतलेली मेहनत फळाली आली असून, जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असतानाही स्पर्धेत तिने सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत क्रमवारीतील दुसऱया, नवव्या स्थानावरील खेळाडूंना धूळ चारली. मात्र, अंतिम फेरीत तिच्या समोर जागतिक क्रमवारीतील पहिल्या स्थानावरील स्पेनच्या कॅरोलिना मारिनचे खडतर आव्हान आहे. कॅरोलिनाचे आव्हान मोडीत काढून महिला बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास घडविण्यासाठी पी.व्ही.सिंधू सज्ज आहे.

कॅरोलिना मारिनची खेळण्याची शैली ही चिनी आणि जपानी खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. आतापर्यंत कॅरोलिना आणि सिंधू यांच्यात सात सामने जाले असून, यातील चार सामने कॅरोलिनाने जिंकले आहेत. सिंधू अंतिम फेरीत दबावात खेळते हा इतिहास आहे. सिंधू आतापर्यंत अनेकवेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. परंतु अनेकवेळा तिला अपयश आले. तरीही रिओमधील पी.व्ही.सिंधूने केलेला आक्रमक खेळ पाहता अंतिम फेरीतही ती कॅरोलिनाचा सामना करताना ती आक्रमकता कायम राखेल अशी आशा आहे. नेटचा उत्तम ताबा, चपळता आणि आक्रमकपणा ही सिंधूची बलस्थाने या स्पर्धेत प्रकर्षाने पुढे आली. याच जोरावर सिंधूला कॅरोलिनावर दबाव निर्माण करण्यात यश येऊ शकते. अंतिम फेरीचा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित असून, प्रत्येक जण टेलिव्हिजन, ऑनलाईन, सोशल मीडियाच्या अशा विविध माध्यमातून सामन्यावर लक्ष ठेवून असतील. सुवर्णपदकाच्या लढाईचा हा महत्त्वपूर्ण सामना कुठे आणि कसा पाहता येईल? याबद्दलची माहिती-

Women’s singles badminton final schedule: PV Sindhu vs Carolina Marin.

# पी.व्ही.सिंधू विरुद्ध कॅरोलिना मारिन सामना कुठे पाहता येईल?-

रिओ ऑलिम्पिकमधील महिला बॅडमिंटनचा अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स ३ या वाहिन्यांसोबतच डीडी नॅशनल वाहिनवरही पाहता येईल. याशिवाय स्टार वाहिनीच्या ‘हॉटस्टार अॅप’वरही सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

# पी.व्ही.सिंधूचा सामन्याची तारीख, वेळ-

पी.व्ही.सिंधूचा सामना भारतीय वेळेनुसार गुरूवार १९ ऑगस्ट २०१६, सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांना सुरु होणार आहे.

# पी.व्ही.सिंधूचा सामना ऑनलाईन कुठे पाहता येईल?-

सामन्याचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण ‘स्टार स्पोट्स डॉट कॉम’वर पाहता येईल, तसेच ‘हॉटस्टार’वही सामन्याचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.