रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ एकीकडे चाचपडत असताना महिला संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कडव्या संघर्षांनंतरही ब्राझीलच्या महिलांना स्वीडनकडून पराभव पत्करावा लागला.

निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातही सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये स्वीडनने ४-३ अशी बाजी मारली. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर जर्मनीचे आव्हान असेल. जर्मनीने लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या कॅनडाला २-० असे नमवले.

ब्राझीलच्या आक्रमणाला अभेद्य बचावाचे प्रत्युत्तर देऊन स्वीडनने उपांत्य फेरीतील चुरस वाढवली. संपूर्ण सामन्यात ब्राझील वरचढ वाटत होता, परंतु स्वीडनची बचावफळी ओलांडण्यात त्यांना अपयश आले. स्वीडनच्या गोलरक्षक लिंडाहल हेडव्हिगने यजमानांचे अनेक प्रयत्न हाणून पाडल्यामुळे सामन्याची उत्सुकता अधिक ताणली होती. शूटआऊटमध्ये  स्वीडनकडून लोट्टा शेलिन, कॅरोलीन सेगेर, नीला फिशर व लिसा डॅहलक्वीस्टने गोल केले, तर ब्राझीलकडून मार्टा, अ‍ॅल्व्हेस अँड्रेसा व राफेली यांना गोल करता आले.