कुस्तीपटू साक्षी मलिक हिने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. भारतीयांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता. ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या अनेक खेळाडूंकडून भारताला पदकाची अपेक्षा होती पण पदरी मात्र निराशाचा पडली ही निराशा साक्षीने दूर केली. देशभरातून तिच्यावर कौतुक आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे याचवरून भारत विरुद्ध पाकिस्तान असे ट्विटरवॉर सुरू आहे. पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराने साक्षी मलिक आणि तिच्या कांस्य पदक जिंकण्यावरून भारतात चाललेल्या जल्लोषावर टीका केली आहे. ‘भारताने ११९ प्रतिस्पर्धी रिओ ऑलिम्पिकमध्ये पाठवले. त्यापैकी फक्त एकानेच पदक जिंकले तेही कांस्य पण भारतात जणू २० पदक जिंकल्यासारखा जल्लोष सुरू आहे’ असे ट्विट या पत्रकाराने केले. त्याच्या या ट्विटवर पाकिस्तान विरुद्ध भारत असे ट्विटरवॉर रंगले आहे. या पत्रकाराने केलेल्या ट्विटला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘साक्षीचे एक पदक मला १००० पदकांच्याही बरोबर आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे कारण ती भारतीय आहे आणि एक स्त्री आहे’ असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
या पत्रकराने भारताच्या रिओ ऑलिम्पिक सहभागाबद्दल अनेक आक्षेपार्ह ट्विट केली आहेत. ‘भारताची लोकसंख्या अब्जावधी आहे असे असताना फक्त एकच पदक भारत घेऊन येतो तर दुसरीकडे फक्त पाच कोटी लोकसंख्या असलेला नॉर्वे देश दोन पदक घेऊन येतो’ अशी उपहासात्मक टीका या पत्रकाराने केली. त्याच्या या वक्तव्यावर अनेक भारतीय संतापले आहेत. भारतीय खेळाडूंवर आक्षेपार्ह ट्विट करून हा पत्रकार थांबला नाही तर हा वाद त्याने थेट काश्मीर हिंसाचारापर्यंत नेला. ‘रिओमध्ये भारतीय सैनिकांना देखील पदक मिळतील कारण ते काश्मीरी नागरीकांचे डोळे फोडण्यात माहिर आहेत’ हे देखील त्याने ट्विट केले. त्याच्या या ट्विटमुळे भारतीय नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.