ऑलिम्पिकमधील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवणाऱ्या उसैन बोल्टने आपल्याला क्रीडा क्षेत्रातील सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत मला स्थान द्यावे, अशी विनंती केली आहे. पेले, मोहम्मद अली आणि मायकेल फेल्प्स यांच्यासारख्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये माझे नाव घेतले जावे, अशी इच्छा बोल्टने प्रदर्शित केली.

‘‘एक सर्वोच्च खेळाडू व्हावे, याच उद्देशाने मी खेळाकडे पाहिले. अली आणि पेले यांच्याप्रमाणेच आपले नावे व्हावे, असे मला वाटायचे. तुम्ही मंडळी माझ्याबाबत काय लिहाल, याचीच मला उत्सुकता आहे,’’ असे बोल्टने या वेळी सांगितले.

बोल्टने आपल्या कारकीर्दीत एकंदर १९ ऑलिम्पिक आणि जगज्जेतेपदांची कमाई केली आहे. त्यामुळेच २०० मीटर ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची वैयक्तिक शर्यत ठरली. 

मी जगात महान असल्याचे सिद्ध केले आहे. नेमके यासाठी मी रिओत आलो होतो. याचकरिता माझे अखेरचे ऑलिम्पिक असल्याचे मी म्हणालो होतो. मला आणखी काही सिद्ध करायची मुळीच आवश्यकता नाही.

उसैन बोल्ट

 

बोल्टचा आठवावा प्रताप!

२०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक

रिओ दी जानिरो ; ‘वेगाचा अनभिषिक्त सम्राट’ असे बिरुद मिरवणाऱ्या उसैन बोल्टने ऑलिम्पिक इतिहासात आणखी एका सोनेरी अध्यायाची नोंद केली. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत बोल्टने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई करीत आपल्या ऑलिम्पिक कारकीर्दीतील आठवे सुवर्णपदक प्राप्त केले.

काही दिवसांपूर्वी १०० मीटर शर्यत सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचा विश्वविक्रम बोल्टने प्रस्थापित केला होता. ऑलिम्पिक स्टेडियमवर आपला हाच आवेश राखत २०० मीटरमध्ये बोल्टने १९.७८ सेकंदांची वेळ नोंदवत विजेतेपदावर नाव कोरले. मात्र आपला स्वत:चा १९.१९ सेकंदांचा विश्वविक्रम तो मोडू शकला नाही. कॅनडाचा आंद्रे डी ग्रासीला (२०.०२ सेकंद) रौप्यपदक आणि फ्रान्सच्या ख्रिस्टोफी लेमॅट्रीला (२०.१२ सेकंद) कांस्यपदक मिळाले.

बोल्टची शर्यत पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. ब्राझीलवासीयांनी उत्साहाने त्याच्या वेगाला दाद दिली. या विजयामुळे २९ वर्षीय बोल्ट आता ‘तिहेरी हॅट्ट्रिक’च्या उंबरठय़ावर आहे. १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर अशा तीन शर्यतींमध्ये बोल्टने २००८ आणि २०१२मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या रिले शर्यतीतसुद्धा सुवर्णपदक जिंकण्यासाठी बोल्ट उत्सुक आहे.

स्पध्रेनंतर बोल्ट म्हणाला, ‘‘मला वेगाने पळून अधिक चांगली वेळ नोंदवायची होती. मात्र विश्वविक्रम मोडणे कठीण आहे, याची पुरती जाणीव मला होती. माझ्या पायांना मी बजावले होते, आपल्याला आणखी वेगाने धावायचे आहे.’’

अमेरिकेचा सुवर्णचौकार

अमेरिकेच्या अ‍ॅथलेटिक्स चमूने चार सुवर्णपदकांची कमाई करीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेने डीकॅथलॉन, गोळाफेक याचप्रमाणे पुरुष आणि महिलांमध्ये ४०० मीटर अडथळा शर्यतीत अमेरिकेने सुवर्णपदकाची कमाई केली.

अ‍ॅश्टॉन ईटॉनने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकताना १० प्रकारांमध्ये ८८९३ गुण मिळवले आणि फ्रान्सच्या केव्हिन मायेरवर मात केली. त्याने रौप्यपदक मिळवताना ८८३४ गुण मिळवले.