अखेरच्या ऑलिम्पिक स्पध्रेत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे दडपण प्रत्येक दिग्गज खेळाडूंवर असते. या ऑलिम्पिक स्पध्रेनंतर आपण पुन्हा मैदानावर उतरणार नाही, याची जाण असलेला खेळाडू जीव ओतून खेळ करतो. रिओ ऑलिम्पिकमध्येही असे अनेक दिग्गज खेळाडू होते की स्पध्रेनंतर त्यांना सामान्यांसारखे जगावे लागणार आहे. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले मैदान नाही की आपल्या नावाचा जयघोष नाही. त्यामुळेच अखेरची स्पर्धा अविस्मरणीय करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. रिओत दाखल झालेल्या अशा दिग्गज खेळाडूंमध्ये कायम लक्षात राहील तो जमैकाचा उसेन बोल्ट.

‘पृथ्वीवरील वेगवान माणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोल्टने रिओचा निरोपही त्याला हवा तसा घेतला. रिओत अखेरच्या ऑलिम्पिक स्पध्रेत सहभाग घेण्यासाठी बोल्ट रिओ दी जानिरोत दाखल झाला, तेव्हापासून तो चर्चेचा विषय बनला आहे. मैदानी स्पध्रेत त्याने गाठलेली उंची कदाचित भविष्यात कुणी गाठेलही. मात्र त्याचा हसमुख चेहरा आणि मस्तीखोर स्वभाव शोधून सापडणार नाही. गळ्यात मोठाले हेडफोन्स (संगीत ऐकण्यासाठी उपयुक्त श्रावक), डोळ्यावर गडद रंगाचा चष्मा, काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि जीन्स असा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा पेहराव करून तो रिओत दाखल झाला. त्याचा विमानतळावरील वावर हा सर्वाना आकर्षित करत होता. दिग्गज खेळाडू असल्याचा माज जराही त्याच्यात जाणवत नव्हता, तर अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा खेळत असल्याचा तणावही दिसत नव्हता. आपल्या वैशिष्टय़पूर्ण मनमौजी स्वभावाने कॅरेबियन लोक ओळखली जातात, अगदी तसाच बोल्ट वावरत होता. या वागण्याची अनेकांनी खिल्ली उडवली, तरी त्याची दखल घेणेही त्याने महत्त्वाचे मानले नाही. पण रिओत दाखल होण्यापूर्वी त्याने इतिहास घडविण्याचा निर्धार मनाशी पक्का केला होता आणि तो आत्मविश्वास त्याच्यात उठून दिसत होता.

एखाद्या खेळाडूला जिंकण्यासाठी आत्मविश्वासापलीकडे कशाचीच गरज नसते, हे त्याने मैदानावरील कामगिरीने दाखवून दिले. रिओत दाखल झाल्यानंतर तेथील नृत्यांगणांसोबत ‘सांबा’ नृत्य करून त्याने मनमौजी स्वभावाला वाट मोकळी केली. बेभान होऊन संगीतावर थिरकणाऱ्या बोल्टला पाहून, तो आपल्यातील एक असल्याचे तेथील नागरिकांनाही वाटू लागले आणि म्हणूनच ऑलिम्पिक स्टेडियममधील त्याच्या प्रत्येक पात्रता फेरीला किंवा प्रत्यक्ष सामन्याला त्याला स्थानिक प्रेक्षकांचा अधिक पाठिंबा मिळाला. त्यामुळेच मैदानावर शर्यत सुरू होण्यापूर्वी तो नृत्य करून प्रेक्षकांचा उत्साह वाढवत होता. प्रत्यक्ष शर्यतीत अंतिम रेषेनजीक आल्यावर उगाच मागे वळून पाहताना इतर स्पर्धकांना डिवचण्याची त्याची कृती चर्चेचा विषय बनली. शनिवारी ऑलिम्पिक स्टेडियमवर त्याने विक्रमी नववे सुवर्णपदक जिंकून रिओचा निरोप घेतला.

मैदानावर महासत्ता गाजवणारा हा खेळाडू आता पुढे काय करणार, हा प्रश्न साऱ्यांनाच आत्तापासून पडणे साहजिकच आहे. पण त्याने पुढे काय करावे, याचा निर्णय त्याची आई जेनिफर यांनी आधीच घेतला आहे. १२-१३ वर्षांचा असल्यापासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू रिओ ऑलिम्पिकनंतर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. जेनिफर यांनी वधूची शोधाशोधही सुरू केली आहे. नातवंडांना खेळवण्यासाठी उत्सुक असलेल्या जेनिफर यांनी उसेनलाही मुलगी शोधण्याचा फर्मान सोडला आहे. त्यानेही आईच्या या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र होणारी पत्नी कोण, याबाबत त्याने कमालीची गुप्तता पाळली आहे. गेली दोन वर्षे त्याचे कॅसी बेनेटसोबत मैत्रीसंबंध आहेत आणि त्यामुळेच तिच्यासोबत लग्नबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील बोल्टच्या प्रत्येक विजयाचा आनंद समाजमाध्यमावर बेनेट जल्लोषात साजरा करत आहे. बोल्टने आता लग्न करावे आणि संसार थाटावा असे जेनिफर यांनाही वाटत आहे. त्यामुळे बोल्ट मायदेशी परतल्यावर आपल्या प्रेमाची कबुली आईजवळ देईल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता बोल्टच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे.

 

– स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com