रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्य पदकाची कमाई करून रिओमध्ये भारताचे खाते उघडले. साक्षी मलिकच्या या कामगिरीमुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेला दहा दिवस उलटूनही भारताच्या पदरात एकही पदक आले नव्हते, पण साक्षीने गुरूवारी कांस्य पदकाची कमाई करून नवी उमेद निर्माण केली. साक्षी मलिकच्या विजयाचा आनंद देशभर विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. साक्षी पदक जिंकणार का? अशी आशा ठेवून तिचे कुटुंबिय रात्री उशीरा तिचा सामना टेलिव्हिजनवर पाहात होते. साक्षीने सामना जिंकल्यानंतर तिच्या घरात एकच जल्लोष सुरू झाला. साक्षीची आई प्रचंड खुष झाली. आपल्या मुलीने मिळविलेल्या यशाच्या आनंदात सुदेश मलिक या आनंदीत होऊन नाचू लागल्या, संपूर्ण घरात जल्लोषाचे वातावरण होते.
कांस्य पदक जिंकल्यानंतर साक्षीसोबत तिच्या आईचे दूरध्वनीवर बोलणे देखील झाले. लागोपाठच्या सामन्यांमुळे तू थकली असशील ना? आराम कर बेटा, असं मी म्हटल्यावर तिने पदक जिंकल्यानंतर कुणाला थकवा येईल का असं म्हणत आपण खूप खुष असल्याचे सांगितल्याचे सुदेश मलिक म्हणाल्या. साक्षीने केलेल्या कामगिरीचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही, तिचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया साक्षीचे वडील सुखबीर मलिक यांनी दिली.
साक्षीच्या वडीलांनी तर संपूर्ण परिसरात मिठाई वाटून आपल्या मुलीने मिळविलेल्या यशाचे कौतुक केले. साक्षीच्या हरियाणातील घर तिच्या नातेवाईक आणि शेजाऱयांनी फुलून गेले. सर्वजण साक्षीने केलेल्या कामगिरीबद्दल तिच्या आई-वडिलांना शुभेच्छा देत होते. साक्षी पदक घेऊन केव्हा घरी परतत आहे, याची आता आम्ही वाट पाहत आहोत. तिचे आम्ही जोरदार स्वागत करण्याचे कुटुंबियांनी ठरविले आहे.
First Published on August 18, 2016 4:46 pm