scorecardresearch

रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळ्याची संपूर्ण माहिती कुठे आणि कधी पाहता येईल?

रिओ ऑलिम्पिक २०१६ जगभरातील तब्बल दहा हजारांहून अधिक खेळाडू ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत.

रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळ्याची संपूर्ण माहिती कुठे आणि कधी पाहता येईल?
Rio olympic 2016 : रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्त्व नेमबाज अभिनव बिंद्रा करणार आहे.

रिओ ऑलिम्पिक २०१६ ब्राझीलच्या मराकाना स्टेडियमवर उदघाटनाची जय्यत तयारी

ब्राझीलमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची रेलचेल आहे. ब्राझीलच्या ‘रिओ दी जानेरो’मध्ये येत्या ५ ऑगस्टपासून ऑलिम्पिकच्या महामेळ्याला सुरूवात होणार असून, यासाठी जगभरातील तब्बल दहा हजारांहून अधिक खेळाडू ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत.

क्रीडा जगतात अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकून देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस ठेवून प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत दाखल होतो. त्यामुळे सर्व स्पर्धक सध्या जोरदार तयारी करत आहेत. ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनावरून स्थानिक पातळीवर असंतोष असला तरी सर्व वाद दुर्लक्षित करून तेथील प्रशासन स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसर पडू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यासाठी तब्बल ११.३९ कोटी डॉलर इतका खर्च करण्यात आला आहे. उदघाटन सोहळ्याचे दिग्दर्शक फर्नांडो मेईरलेस यांच्या माहितीनुसार रिओ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च लंडन ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्याच्या खर्चापेक्षा १२ पटीने कमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ब्राझीलची सांबा संस्कृती आणि दरवर्षी होणाऱया कार्निव्हलची ओळख करून देणारे आकर्षक सादरीकरण रिओ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यात करण्याचा मानस आयोजकांचा आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा रंगारंग उदघाटन सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल-

#रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळा कधी?
रिओ ऑलिम्पिक २०१६ चा उदघाटन सोहळा शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी होणार असून, ब्राझीलच्या मराकाना स्टेडियमवर हा सोहळा रंगणार आहे. अर्थात ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार उदघाटन सोहळा शुक्रवारी होणार असला तरी भारतीय वेळेनुसार हा सोहळा शनिवारी पाहता येईल.

# रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळा केव्हा होणार?
ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा नेमका किती वाजता सुरू होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री ८ वाजता उदघाटन सोहळा सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार ऑलिम्पिक चाहत्यांना उदघाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शनिवारी पहाटे साडेचार वाजता पाहता येणार आहे.

# रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळा भारतात कुठे पाहता येईल?
रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या उदघाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर पाहता येईल. याशिवाय, या अभुतपूर्व सोहळ्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला indianexpress-loksatta.go-vip.net वर देखील पाहता येतील. शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून लोकसत्ताच्या संकेतस्थळावर तुम्हाला उदघाटन सोहळ्याचे अपडेट्स वाचता येतील.

#रिओ ऑलिम्पिक २०१६ उदघाटन सोहळ्याचे भारतात ऑनलाईन प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
रिओ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

#रिओ ऑलिम्पिक २०१६ भारतीय चमूचे नेतृत्त्व कोण करणार?
रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्त्व नेमबाज अभिनव बिंद्रा करणार आहे. यंदा भारताकडून तब्बल ११९ खेळाडूंचे पथक रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.

# रिओ ऑलिम्पिक २०१६ : ..या वेशभुषेत दिसतील भारतीय खेळाडू
रिओ ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यासाठी भारतीय खेळाडूंचा चमू हा पारंपारिक वेशभुषेत पाहायला मिळणार आहे. महिला खेळाडू क्रेप किंवा शिफॉन कापडाने तयार करण्यात आलेल्या साडीत दिसून येतील, तर कॉलर असलेला ब्लाऊज डिझाईन करण्यात आला आहे. साडीच्या रंगात सौम्य प्रमाणात राष्ट्रध्वजाचे रंग पाहायला मिळतील. साडीला पर्याय म्हणून एक वेस्टर्न आऊटफिट देखील डिझाईन करण्यात आला आहे. या आऊटफिटच्या छातीच्या भागावर तिरंगा असेल.
पुरूष खेळाडू हे बंद गळ्याचा जॅकेट आणि जोधपूरी पायजमा परिधान केलेले दिसून येतील. त्यांच्या या पारंपारिक पोशाखाच्या छातीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज असणार आहे. उदघाटन सोहळ्यात परेड करताना भारतीय खेळाडूंना अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून पोशाख भरजरी राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

# रिओ ऑलिम्पिक २०१६ संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन कशी आणि कुठे पाहता येईल?
पाच ऑगस्टपासून सुरू होणाऱया रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रत्येक सामना हा नेटिझन्सला लाइव्ह पाहण्याची सोय रिओ ऑलिम्पिकच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. NBCOlympics.com या संकेतस्थळावर ऑलिम्पिक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. याशिवाय, NBC चे मोबाईल अॅप देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. NBC चे मोबाईल अॅप्लिकेशन हे आयफोन, आयपॅडसह अँड्रॉईड आणि टॅबलेट वापरकर्त्यांना अगदी सहजरित्या अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. सोनीचा प्ले स्टेशन देखील ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी उत्तम माध्यम आहे. प्ले स्टेशनच्या माध्यमातून तुम्ही NBC, CNBC, MSNBC, Telemundo, NBCSN, Bravo यापैकी कोणत्याही एका वाहिनीवरून ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

VIDEO: रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धक सज्ज, शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळा

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक ( Rio-2016-olympics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When is rio olympics opening ceremony 2016 what time does it start live streaming online and live tv coverage

ताज्या बातम्या