पी.व्ही.सिंधू आणि साक्षी मलिक यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, अशी मुक्ताफळे उधळून केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पी.व्ही. सिंधू व साक्षी मलिक यांच्यासह खेलरत्न पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि तेनसिंग नोर्गे पुरस्कार विजेत्या खेळाडुंची भेट घेतली. यावेळी पत्रकारांना माहिती देताना क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकचा उल्लेख रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या म्हणून केला. दरम्यान, गोयल यांच्या या विधानामुळे सोशल मिडीयावरून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाली. मात्र, गोयल यांनी कधीकधी चुकून असे घडते, सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. बोलताना एखाद्याची जीभ घसरल्यामुळे चूक झाली असेल तर त्यामुळे लोकांनी इतकी टीका करण्याचे कारण नाही. कधीकधी असे घडते, असे गोयल यांनी सांगितले. मला पदकविजेते खेळाडू असे म्हणायचे होते. मात्र, मी चुकून सुवर्णपदक विजेत्या खेळाडू असे बोलून गेलो. असो, आगामी काळात आपण कदाचित सुवर्णपदकही जिंकू, असे गोयल यांनी म्हटले. यापूर्वी गोयल आणि त्यांच्या समर्थकांच्या गैरवर्तनामुळे रिओ २०१६ संयोजन समितीच्या खंडनिहाय व्यवस्थापक सराह पीटरसन यांनी भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता यांना खरमरीत पत्र पाठवून समज दिली होती. गोयल यांचे अधिस्वीकृती पत्र रद्द होऊ शकते, असा इशारा या पत्राद्वारे त्यांना देण्यात आला होता. मात्र, विजय गोयल यांनी आपल्यावरील गैरवर्तनाचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. ऑलिम्पिक क्रीडानगरीत असे काहीच घडले नाही. माझ्याविरोधात गैरवर्तनाची कोणतीही तक्रार नाही, असे म्हटले होते.