Rishabh Pant Hits Huge Six Outside Stadium Galle Test: कसोटी क्रिकेट खेळताना मैदानात गगनचुंबी षटकार मारण्याची कला भारताच्या ऋषभ पंतमध्ये आहे.क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक अशी ओळख असलेल्या पंतने अनेक भन्नाट फटके खेळले आहेत. ऋषभ पंतने असाच एक कमालीचा फटका भारत आणि श्रीलंका गॉल कसोटीत पाहायला मिळाला. ऋषभ पंतने या सामन्यादरम्यान असा एक षटकार मारला जो थेट स्टेडियमबाहेर गेला, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपला आक्रमक अंदाज दाखवला. वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा पंतच्या या आक्रमकतेचा पहिला बळी ठरला. कुमारा गोलंदाजीला येताच पंतने त्याच्या पहिल्याच चेंडूवर आकाशात उंच उडणारा गगनचुंबी षटकार ठोकला. डावखुरा फलंदाज पंत क्रीजमधून पुढे आला आणि लेग साइडच्या दिशेने सरकत त्याने जोरदार फटका लगावत चेंडू वाइड लॉन्ग-ऑफच्या दिशेने सीमापार पाठवला.

ऋषभ पंतच्या फटक्यात एवढी ताकद होती की चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. कॅमेऱ्याने स्टेडियमजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या बसच्या दिशेने फोकस केला आणि चेंडू तिथे जाऊन पडल्याचं दिसून आलं. चेंडू त्यानंतर सापडत नसल्याने अखेर अंपायरना चेंडू बदलावा लागला आणि नवा चेंडू घेण्यात आला.

ऋषभ पंतच्या या दणदणीत षटकारासह कसोटी क्रिकेटमधील आपल्या षटकारांची संख्या ९९ वर पोहोचली आहे. पंतच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक षटकार झळकावणारे केवळ तीन फलंदाज आहेत, बेन स्टोक्स (१३८), ब्रेंडन मॅक्क्युलम (१०७) आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट (१००). तर भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकारांचा विक्रम ऋषभ पंतच्या नावे आहे आणि यासह १०० षटकारांचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे आहे.

ऋषभ पंतने रवींद्र जडेजा व देवदत्त पडिक्कल यांच्याबरोबर चांगल्या भागीदारी रचल्या आणि संघाच्या डावांमध्ये महत्त्वपूर्ण धावांची भर घातली आहे. भारतीय संघ आता किती धावांची आघाडी घेणार, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.