scorecardresearch

Rishabh Pant Car Accident: अपघातानंतर अनेकवेळा पलटी झाली कार; पंतला मदत करण्याऐवजी तरुणांनी पैसे घेऊन काढला पळ

Rishabh Pant Car Accident: ऋषभची कार मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावर आदळल्याने अपघात झाला. या अपघातानंतर काही तरुणांनी पंतच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला.

Rishabh Pant Car Accident: अपघातानंतर अनेकवेळा पलटी झाली कार; पंतला मदत करण्याऐवजी तरुणांनी पैसे घेऊन काढला पळ
ऋषभ पंतच्या कारला अपघात (फोटो सौजन्य- जनसत्ता)

Cricketer Rishabh Pant Accident Updates: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या मर्सिडीज कारला मोठा अपघात झाला आहे. तो दिल्लीहून रुरकीला जात होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याच्या कारला अपघात झाला आणि आग लागली. कारमध्ये ऋषभ एकटाच होता, तो स्वतः गाडी चालवत होता.

या अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले आहे. मात्र अपघातादरम्यान तिथे पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत केलीच नाही, शिवाय त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला.

ऋषभची कार मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावर आदळली –

नरसन सीमेवर ज्या ठिकाणी हा अपघात झाला. तिथे मातीचा ढीग होता. या ढिगाऱ्याच्या धडकेत ऋषभची कार अनियंत्रित झाल्यामुळे अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी कुशल वीर यांनी सांगितले की, ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत असताना अचानक त्याची कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यानंतर कार अनियंत्रित झाल्याने आणि रेलिंगचे खांब तोडत कार सुमारे २०० मीटर घासत पुढे गेली. यादरम्यान कार अनेक वेळा उलटली आणि कारने पेट घेतला.

हेही वाचा – Rishabh Pant Accident CCTV: ऋषभ पंतच्या अपघाताचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

काही तरुणांनी ऋषभच्या बॅगेतील पैसे घेऊन काढला पळ –

ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्याकडे एक बॅगही होती. त्याचवेळी अपघातस्थळी पोहोचलेल्या काही तरुणांनी, ऋषभला मदत न करता त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन तेथून पळ काढला. त्यांनीच पोलिसांना कळवले आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: “…अन् अपघात झाला”; गाडी जळून खाक होण्याआधी नेमकं काय घडलं ऋषभ पंतनेच सांगितलं

उपचाराचा सर्व खर्च उत्तराखंड सरकार उचलणार –

कार अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशा सूचना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडून अपघाताची सविस्तर माहिती घेतल्यानंतर सूचना दिल्या. ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले. एअर अॅम्ब्युलन्सची गरज भासल्यास त्याचीही व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 12:09 IST

संबंधित बातम्या