Rishabh Pant requests Uttarakhand CM Pushkar Singh Dhami: अलीकडेच, भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा उत्तराखंडमधील सर्वाधिक वैयक्तिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे. पंतने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे २३.८४ कोटी रुपये कर भरला; तरीही, ज्या राज्यात तो सर्वाधिक करदाता म्हणून चर्चेत आला, त्याच राज्यात सध्या त्याला घर शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यासाठीच त्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.

परिस्थितीमुळे हताश होऊन पंतने मदतीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदत मागितली आहे. ऋषभ पंत उत्तराखंडमध्ये घरासाठी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु गेल्या तीन वर्षांत त्यांना योग्य जमीन मिळालेला नाही; म्हणूनच त्याने मुख्यमंत्र्यांची मदत मागितली आहे.

ऋषभ पंतने उत्तराखंड्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी केलेल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?

ऋषभ पंतने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत लिहिलं, “नमस्कार सर, कसे आहात? उत्तराखंडचा मूळ रहिवासी असूनही, मला तिथून दूर जाऊन बराच काळ झाला आहे. दिल्लीहून येऊन उत्तराखंडमध्ये घरासाठी जमीन घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण राहण्यासाठी मला अद्याप योग्य जागा मिळालेली नाही. माझं माझ्या उत्तराखंडवर खूप प्रेम आहे. योग्य जमीन मिळवणं हे आजकाल अत्यंत कठीण काम झालं आहे, त्यामुळे जमीन मिळवण्यासाठी मी आपल्या सहकार्याची नम्र विनंती करतो. एक जमीन मला मिळणं अद्याप बाकी आहे, ती जमीन मला तेव्हाच मिळायला हवी होती जेव्हा मी उत्तराखंडचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून राज्याचा प्रचार केला होता.”

पंतने पुढे लिहिलं, “इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून, मला माझ्या मूळ गावी परत जाऊन त्या भागाच्या विकासात हातभार लावायचा आहे. मला माझ्या डोंगराळ भागातील बांधवांमध्ये पुन्हा स्थायिक व्हायचं आहे. कृपया या प्रकरणाकडे लक्ष द्यावं; तीन वर्षे उलटूनही मला अद्याप जमीन मिळालेली नाही. मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.”

ऋषभ पंत उत्तराखंडमध्ये जमिनीसाठी पैसे मोजण्यासही तयार आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या एका पोस्टमध्ये पंतने म्हटलं आहे, “आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल भेटवस्तू मिळणं ही नक्कीच आनंदाची गोष्ट असेल; तरीही, आपल्या परवानगीने मला ती जमीन सरकारकडून अधिकृत दराने विकत घ्यायला आवडेल, जेणेकरून मी माझ्याच राज्यात माझं पहिलं घर बांधू शकेन. कृपया मला मदत करा… खरं सांगायचं तर, हा विषय आपल्यासमोर कसा मांडावा, याबद्दल मला खरंच सुचत नव्हतं.”

ऋषभ पंत मूळचा उत्तराखंडचा असला, तरी त्याला क्रिकेटमधील ओळख दिल्लीमुळे मिळाली. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी खेळतो आणि याच संघासोबत मिळवलेल्या यशामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. आतापर्यंत पंतने ५० कसोटी सामने, ३१ एकदिवसीय सामने आणि ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.