Rishabh Pant On Comeback: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा काही महिन्यांपूर्वी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक होता. पण सध्या तो केवळ कसोटी संघाचा भाग आहे. त्याला वनडे आणि टी-२० संघातील स्थान गमवावं लागलं आहे. आता १ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या इराणी कप स्पर्धेत तो रेस्ट ऑफ इंडिया संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरतोय. दरम्यान त्याने आपल्या पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
बिझनेस ऑफ स्पोर्ट पॉडकास्टमध्ये बोलताना ऋषभ पंत म्हणाला की, “नक्कीच,वाईट वाटतं. पण एक खेळाडू म्हणून एक गोष्ट समजून घ्यावी लागते. ती म्हणजे, जेव्हा अडथळे येतात, तेव्हा पुनरागमनही होतं.” तसेच भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचं उदाहरण देताना तो म्हणाला, “एक खेळाडू म्हणून कामगिरीचा आलेख नेहमीच खाली वर जात असतो, सर्वच विराट कोहली नसतात. कारण विराट कोहलीची कारकिर्द खूप असाधारण राहिली आहे.”
शुबमन गिलची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली, त्यावेळी ऋषभ पंत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होता. पण त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये उफकर्णधारपद गेलं असलं तरीदेखील त्याचं संघातील स्थान कायम आहे. कारण, कसोटी क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी करून सामना फिरवण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. अनेकदा त्याने हातून निसटलेल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. सध्या कुठलीही कसोटी मालिका नसल्याने तो इराणी कप स्पर्धा खेळण्यासाठी उतरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये संघात स्थान कायम ठेवायचं असेल, तर त्याला इराणी कपमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. त्यानंतर तो रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना दिसून येऊ शकतो. येत्या काही दिवसात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा देखील भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. ऋषभ पंतचं लक्ष्य आता वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणं हेच असणार आहे.जर त्याला या संघात स्थान मिळवायचं असेल, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे.
