Rishabh Pant Breaks Shubman Gill Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ ३७२ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरला. पण ४ फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी केवळ ६ गडी बाद करायचे आहेत. तर श्रीलंकेला सामना वाचवण्यासाठी पूर्ण दिवस फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान चौथ्या दिवशी भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या डावात फलंदाजी करताना त्याने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने शुबमन गिलचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतला चांगली सुरुवात मिळाली होती. पण या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या डावात इतर फलंदाज संघर्ष करत असताना पंतने फलंदाजीची धुरा आपल्या हाती घेऊन दमदार फटकेबाजी केली. या डावात त्याने २ षटकारांच्या साहाय्याने ६६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत ४१ कसोटी सामन्यांतील ७३ डावात २८८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने कर्णधार शुबमन गिलला मागे टाकलं आहे. शुमबन गिलच्या नावे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ४१ सामन्यांमधये २८६७ धावा करण्याची नोंद आहे. या दोन्ही फलंदाजांकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपमध्ये ३००० धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. पण पहिल्यांदा हा आकडा कोण गाठणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ऋषभ पंत अव्वल स्थानी
ऋषभ पंत हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर गिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने २७१६ धावा केल्या आहेत. तर या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या रवींद्र जडेजाच्या नावे २६३२ आणि पाचव्या स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे २६१७ धावा करण्याची नोंद आहे. तर युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल या यादीत सहाव्या स्थानी आहे. यशस्वीच्या नावे २५४३ धावा करण्याची नोंद आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कोण?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार जो रुट अव्वल स्थानी आहे. रुटच्या नावे ७७ सामन्यांमध्ये ६६५१ धावा करण्याची नोंद आहे. जो रुटकडे ७००० धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरु शकतो. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या नावे ४६७९ धावा करण्याची नोंद आहे.
