अफगाणिस्तान विरुद्धचा आगामी एकमेव कसोटी सामना आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतवर दुहेरी नामुष्की ओढवली आहे. पंतला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदापासून दूर करण्यात आले आणि एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले आहे. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना दोन्ही मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ ते १० जून या कालावधीत मुल्लानपूर (न्यू चंडीगड) येथे खेळवला जाईल. त्यानंतर तीन एकदिवसीय सामने अनुक्रमे धरमशाला (१३ जून), लखनऊ (१७ जून) आणि चेन्नई (२० जून) येथे होणार आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकितांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची मंगळवारी गुवाहाटी येथे बैठक झाली. या बैठकीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघ जाहीर करण्यात आला. पंतला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले असून इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
नवा उपकर्णधार भारताच्या कसोटी संघाला नवा उपकर्णधार मिळाला आहे. पंतऐवजी ही जबाबदारी अनुभवी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. ‘आयपीएल’मध्ये कर्णधार म्हणून छाप पाडणारा श्रेयस अय्यर एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. दोन्ही संघांचे कर्णधारपद शुभमन गिलकडे कायम आहे.
बुमराला विश्रांती गेल्या काही काळापासून सातत्याने सामने खेळणार्या बुमराला अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी किंवा एकदिवसीय मालिकेत विश्रांती मिळेल अशी चर्चा होती. मात्र निवड समितीने त्याच्याबाबतीत विशेष खबरदारी बाळगताना त्याला दोन्ही प्रारूपांत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘बुमराच्या कार्यभार व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जात आहे. तो इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करेल,’’ असे आगरकर यांनी सांगितले.
विदर्भाच्या हर्ष दुबेसह चार नवे चेहरे…
’ अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी चार नव्या चेहर्यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. विदर्भाचा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे, पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांचा दोन्ही संघांत, तर दिल्लीचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवचा एकदिवसीय संघात आणि राजस्थानचा डावखुरा फिरकीपटू मानव सुथारचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केएल राहुलला कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा अनुभव आहे. त्यामुळे उपकर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडूचा विचार करून आम्ही राहुलला प्राधान्य दिले. ऋषभ पंतने कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो आता एकदिवसीय संघाचा भाग नसला तरी कसोटी संघातील त्याच्या स्थानाला कोणताही धोका नाही.
’ गेल्या दोन रणजी हंगामांत चमकदार कामगिरी करणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकीब नबीला मात्र डावलण्यात आले आहे. हर्ष दुबेने २७ प्रथमश्रेणी सामन्यांत १३३ बळी मिळवले आहेत. तसेच फलंदाजीत नऊ अर्धशतकांसह १०२६ धावाही केल्या आहेत. २०२४-२५च्या रणजी हंगामात त्याने ६९ बळी मिळवले होते. त्यामुळे एका रणजी हंगामात सर्वाधिक बळीचा विक्रम त्याच्या नावे झाला.
पंत उपकर्णधार होता, पण त्याने आता फलंदाज म्हणून सर्वोत्तम कामगिरी करावी असे आम्हाला वाटते. – अजित आगरकर, अध्यक्ष, राष्ट्रीय निवड समिती संघल्ल कसोटी : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (दोघे यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार, मानव सुथार, हर्ष दुबे.
ल्ल एकदिवसीय : शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (दोघे यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
