IPL 2027 Trade Rishabh Pant Kuldeep Yadav: आयपीएल २०२६ नंतर अनेक संघांमध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा होती. स्पर्धा संपून अवघा एक महिना झालेला असताना संघांमध्ये बदलीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतने स्पर्धा संपताच लगेच कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तो पुन्हा दिल्लीकडे जाऊ शकतो, अशी चर्चा होती. आता आयपीएलने या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं असून कुलदीप यादव व ऋषभ पंत यांच्यातील ट्रेड पूर्ण झाला असून दोन्ही खेळाडूंची अदलाबदली झाली आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये मोठा बदल झाला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत आणि दिल्लीचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव यांच्यात ट्रेड पूर्ण झाला आहे. आतापर्यंत कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता, पण आगामी हंगामात तो लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसेल. तर ऋषभ पंत हा लखनौ सुपर जायंट्सऐवजी आपला जुना संघ दिल्ली कॅपिटल्सचा संघ भाग असेल.
ऋषभ पंत हा आयपीएल २०२५ च्या लिलावातील आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. ऋषभ पंतला लखनौने २७ कोटींना संघात सामील केलं होतं. पण आता ट्रेड होऊन दिल्ली कॅपिटल्स संघात जाताना ऋषभ पंतला १२ कोटींचा फटका बसला आहे. ऋषभ पंत लखनौकडून दिल्लीकडे जाताना त्याला १५ कोटी देण्यात आले आहेत. तर कुलदीप यादव त्याच्या मूळ किमतीला म्हणजेच १३.५ कोटींना दिल्लीत लखनौ संघात सामील झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत व कुलदीप यादव यांच्यातील ट्रेडसंबंधित रिपोर्ट्ससमोर आले होते. आता आयपीएलने पोस्ट शेअर करत या ट्रेडवर शिक्कामोर्तब केला आहे. हा ट्रेड ऋषभ पंतची घरवापसी असल्यासारखं मानला जात आहे. पंतने २०१६ ते २०२४ दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधित्व केलं आणि या काळात तो फ्रँचायझीचा एक प्रमुख स्टार खेळाडू होता. पंतने दिल्लीसाठी १११ सामने खेळले होते, पंत हा दिल्लीकडून सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच, २०२१ ते २०२४ या कालावधीतील चार हंगामांमध्ये त्याने ४३ सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं. मात्र, आयपीएल २०२५ च्या ‘मेगा लिलावा’दरम्यान परिस्थिती बदलली.
ऋषभ पंतची घरवापसी
लखनौ सुपर जायंट्सने पंतला २७ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीवर खरेदी केलं होतं. मात्र, एका ‘ट्रेड’नंतर पंत आता १५ कोटींमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. लखनौ साठी गेल्या दोन हंगामांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२५ मध्ये संघ सातव्या स्थानावर राहिला. त्यानंतरच्या हंगामात तर परिस्थिती आणखीच बिघडली आणि आयपीएल २०२६ मध्ये लखनौ (LSG) गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकला गेला. लखनौमध्ये सामील झाल्यापासूनच पंतला संघर्ष करावा लागत होता; तो ना फलंदाजीमध्ये धावा करू शकत होता, ना कर्णधार म्हणून संघाला विजयाकडे नेऊ शकत होता.
कुलदीप यादव दिल्लीमध्ये लखनौमध्ये सामील
दिल्ली कॅपिटल्ससोबतचा कुलदीप यादवचा शानदार प्रवास आता संपला आहे. हा डावखुरा ‘चायनामन’ फिरकीपटू २०२२ मध्ये दिल्लीच्या संघात सामील झाला आणि गेल्या पाच हंगामांत संघाच्या गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ राहिला. कुलदीपने दिल्ली कॅपिटल्ससाठी ६५ सामन्यांत ७२ बळी घेतले आणि अनेकदा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचं चित्र पालटलं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताच्या सर्वात भरवशाच्या फिरकीपटूंपैकी एक मानला जाणारा कुलदीप आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. तो १३.५० कोटी रुपयांच्या सध्याच्या करारासह लखनौ सुपर जायंट्समध्ये (LSG) सामील झाला.
