Rishabh Pant Uttarakhand Land Request CM Response: ऋषभ पंतने ७ ऑगस्टला रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऋषभ पंतने या पोस्टमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग केलं होतं आणि मदतीची मागणी केली होती. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना ऋषभ पंतच्या या विनंतीबाबत वक्तव्य केलं आहे आणि त्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी ऋषभ पंतने राज्यात जमीन खरेदीसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन दिलं. पत्रकारांशी बोलताना धामी म्हणाले की, उत्तराखंडचा असलेला ऋषभ पंतने आपल्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे आणि देशाचं प्रतिनिधित्व करून राज्याचा गौरव वाढवला आहे. सरकारी अधिकारी या प्रकरणाबाबत ऋषभ पंतशी चर्चा करतील आणि त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य व मदत पुरवली जाईल.

“उत्तराखंडमध्ये यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे. शेवटी ऋषभ पंत हा आपल्या राज्याचाच आहे. त्याने स्वतःचं आणि राज्याचं नाव मोठं केलं आहे. त्याने देशासाठी खेळून गौरवही मिळवून दिला आहे, त्यामुळे त्याचं स्वागतच आहे. आमचे अधिकारी त्याच्याशी चर्चा करतील. त्याला कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास आम्ही नक्कीच मदत करू,” असे मुख्यमंत्री धामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

यापूर्वी ऋषभ पंतने एक्स (माजी ट्विटर) वर मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून तो उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असून, दिल्लीहून कायमचं उत्तराखंडमध्ये शिफ्ट होण्याची इच्छा असल्याचं त्याने म्हटलं होतं. तसेच, आपल्या मूळ राज्यात परत जाऊन त्याच्या विकासात योगदान द्यायचं असल्याचंही पंतने स्पष्ट केलं.

२८ वर्षीय ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंडचा असून सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो आणि भारताच्या कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. सध्या तो कोलंबो येथे श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी भारत संघाचा भाग आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणार आहे.

दरम्यान, ऋषभ पंत अलीकडेच उत्तराखंडमधील सर्वाधिक वैयक्तिक कर भरणारा व्यक्ती ठरल्याचीही माहिती समोर आली आहे. वृत्तांनुसार, २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी त्याने सुमारे २३.८४ कोटी रुपये कर भरला आहे.