भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. ऋषभ भारत अ संघाच्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत पंत खेळू शकणार नाही. रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्सने हिरवा कंदील दिला तरच ऋषभ तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो. पंतला साईड स्ट्रेन अर्थात ओटीपोटाचे स्नायू दुखावल्यामुळे खेळता येणार नाही. पंतऐवजी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्मात असलेल्या कुमार कुशाग्रला संघात संधी मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या इराणी चषक स्पर्धेत पंतने शेष भारत संघाचं नेतृत्व केलं. पहिल्या डावात स्वीपचा फटका मारताना पंतला ही दुखापत झाली. दुसऱ्या डावात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याला तापही आला होता. जम्मू काश्मीरच्या डावादरम्यान त्याने यष्टीरक्षणही केले नाही. सध्या पंत बंगळुरूस्थित सेंटर ऑफ एक्सलन्समधील वैद्यकीय चमूच्या देखरेखीखाली आहे. पंत तिसरी कसोटी खेळू शकेल का याबाबत निर्णय वैद्यकीय चमू घेईल.
दुखापतग्रस्त असल्यामुळे पंतने दिल्लीच्या रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्यावहिल्या लढतीसाठी अनुपलब्ध असल्याचं कळवलं होतं. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने याबाबात माहिती दिली होती.
दरम्यान कुमार नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या मालिकेत भारत अ संघाचा भाग होता. पहिल्या लढतीत त्याने शतकी खेळी साकारली होती. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाचा भाग झालेला कुमार १६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडला रवाना होईल. २४ तारखेपासून पहिली कसोटी लिंकन इथे सुरू होणार आहे. दुसरी कसोटी ख्राईस्टचर्च मधल्या हेगले ओव्हल तर तिसरी कसोटी लिंकन इथेच होणार आहे.
भारतीय संघ जंबो अशा न्यूझीलंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी२०, ५ वनडे आणि २ टेस्ट होणार आहेत. पंत भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे. मात्र वनडे आणि टी२० संघात त्याची निवड झालेली नाही.
भारत अ संघ– यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पड्डीकल, रवीचंद्रन स्मरण, ध्रुव जुरेल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर,आकीब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुतार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड, मुकेश कुमार, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक)
