Rishabh Pant use Abusive Language after Match Statement: ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाला राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पंतच्या संघाची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी फारच निराशाजनक राहिला आहे. राजस्थानविरूद्ध देखील वादळी सुरूवातीनंतर संघ २२० धावा करू शकला. या पराभवानंतर बोलताना ऋषभ पंतने शिवी घातल्याचं ऐकू आलं. त्याचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं आहे.
सध्या ऋषभ पंतचं नशीब खराब आहे असंच म्हणावं लागेल. आयपीएलमध्ये त्याच्या संघाची कामगिरी खराब राहिली आहे, त्याला भारताच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे, त्याच्याकडून कसोटी उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे आणि आता त्याने आयपीएलच्या एका मुलाखतीदरम्यान अपमानास्पद भाषेचा वापरही केला आहे. लखनौ सुपरजायंट्सच्या पराभवानंतर ऋषभ पंतने इयान बिशप यांच्याशी बोलताना अपमानास्पद भाषेचा वापर केला होता.
राजस्थानविरूद्ध पराभवानंतर ऋषभ पंतने इयान बिशप यांच्याशी संवाद साधला. पंत म्हणाला, “आर्चरने मधल्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकात ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती उत्कृष्ट होती. आम्ही तिथे आणखी १० धावा करू शकलो असतो, पण शेवटच्या षटकात आम्हाला ते जमलं नाही.”
ऋषभ पंत सामन्यानंतर बोलताना नेमकं काय म्हणाला?
फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर धावसंख्येचा बचाव करण्याबद्दल पंत म्हणाला, “नक्कीच हे कठीण असतं. तुम्हाला कायम आपल्या गोलंदाजांवर विश्वास ठेवायचा असतो, पण काही वेळा परिस्थिती अवघड असते. अशा खेळपट्टीवर गोलंदाजांकडे चुकांची फारशी मुभा नसते आणि खूप सूचना देणंही उपयोगाचं ठरत नाही. काही वेळा साधा प्लॅन ठेवून, प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करत त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं असतं.”
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीबद्दल पंतने सांगितलं, “अनुभव ही अशी गोष्ट आहे जी चांगल्या किंवा वाईट काळातही जाणवतच राहते. कारण अनुभव एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी अनेक वर्षे लागतात. विशेषतः दबावाच्या क्षणी अनुभवच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतो.”
“मी आधीही सांगितलं आहे, सध्याची परिस्थिती काहीही असली तरी आम्हाला आमच्या संघाचा अभिमान आहे. आमच्याकडे असा संघ आहे, जो सामने जिंकू शकतो, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. परिस्थिती आमच्या बाजूने गेली नाही, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यामुळे आम्ही जबरदस्त …. (शिवी) (f**king Good Team) संघ आहोत, ही गोष्ट बदलत नाही,” असं पंत अखेरीस म्हणाला. पंतने बोलताना हा शब्द वापरल्याने त्याला दंड होऊ शकतो आणि बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करू शकते.
