विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतने लखनौ सुपरजायंट्सचं कर्णधारपद सोडलं आहे. यंदाच्या हंगामात लखनौची कामगिरी सुमार झाली होती. त्याची परिणती ऋषभने नेतृत्व सोडण्यात झाली आहे. ऋषभने दोन हंगाम लखनौचं नेतृत्व केलं. लखनौ सुपरजायंट्स संघाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ऋषभने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती संघव्यवस्थापनाला केली होती. व्यवस्थापनाने ही विनंती मान्य केली आहे. नेतृत्व बदल होऊ शकतो असं संकेत टीम डिरेक्टर टॉम मूडी यांनी पत्रकार परिषदेत दिले होते.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू हा मान ऋषभने पटकावला होता. लखनौ सुपरजायंट्स संघाने ऋषभसाठी तब्बल २७ कोटींची बोली लावली. ऋषभला कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून छाप उमटवता आलेली नाही. ऋषभने नेतृत्व सोडल्यामुळे लखनौचं नेतृत्व कोण करणार? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. लखनौच्या संघात एडन मारक्रम, मिचेल मार्श हे कर्णधारपदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आहेत.

२०२५ हंगामात लखनौचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी होता. ऋषभने १३३च्या स्ट्राईकरेटने २६९ धावा केल्या. गेल्या वर्षी त्याने आरसीबीविरुद्ध शतकी खेळी साकारली होती मात्र बाकी सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ त्याला करता आला नाही. यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाची आणखी घसरण होऊन तळाशी फेकले गेले. ऋषभने यंदा १३८च्या स्ट्राईकरेटने ३१२ धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याला केवळ एकदा अर्धशतकी खेळी करता आली.

आयपीएल स्पर्धेत ऋषभच्या नावावर १३९ सामन्यात ३८६५ धावा आहेत. यामध्ये २ शतकं आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. १८१ षटकार आहेत. याबरोबरीने ९० झेल आणि २४ स्टंपिंग नावावर आहेत.

एकाचवेळी वेगवेगळे सल्ले,सूचना मिळत असतील तर गोंधळ होतो असं ऋषभने अनेकदा बोलून दाखवलं होतं. लखनौचं प्रशिक्षकपद जस्टीन लँगर यांच्याकडे होतं. टॉम मूडी टीम डिरेक्टर होते. लान्स क्लुसनर आणि केन विल्यमसन अशी मोठी नावं लखनौच्या कोचिंग टीममध्ये होती मात्र कशानेही त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही.